जव्हार : विनोबा भावे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या ग्रामदान मंडळांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जामसर येथील तुकाराम जाधव यांनी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.राज्यातील विविध छोट्या गावपाड्यांचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून भावे यांनी ग्रामदान मंडळाची संकल्पना मांडली. त्यामुळे राज्यात ती अस्तित्वात आली. कालांतराने लोकशाही मार्गाने व निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. ग्रामदान मंडळ या संकल्पनेत मंडळात अध्यक्ष निवडला जातो. लोकसंख्येच्या एकपंचमांश मतदारांतून हात वर करून अध्यक्ष निवडीची पद्धत आहे. मग, अध्यक्ष सदस्यांची निवड करून गावाच्या विकासासाठी आवश्यक ती कामे करतात. परंतु, आजही सर्वात मोठ्या लोकशाही देशात हात वर करून अध्यक्ष निवड करणे कितपत योग्य आहे. आज ही पद्धत कालबाह्य झाली असून पालघर जिल्ह्यात आजही अस्तित्वात असलेली लाकी, नागझरी, जामसर, बरवाडपाडा ग्रामदान मंडळे रद्द करून त्यांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जाधव यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. (वार्ताहर)अटी विकासासाठी मारक - या निवेदनात ग्रामदान मंडळे व ग्रामपंचायतींना दिला जाणारा निधी यामध्ये मोठी तफावत असल्याने ग्रामदान मंडळांचा विकास हवा तेवढा होत नाही. ग्रामदान मंडळांच्या ठिकाणच्या जमिनी विकताना त्या गावातीलच ग्रामस्थांना विकणे बंधनकारक आहे. सातबाराच्या उताऱ्यावरही ग्रामदान असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. या सर्व अटी गावाच्या विकासासाठी मारक असून ग्रामदान मंडळांच्या ग्रामस्थांना विविध विकासापासून दूर नेत असल्याचे जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
ग्रामदान मंडळांना पंचायतींचा दर्जा द्यावा!
By admin | Published: August 24, 2015 11:12 PM