पालकमंत्र्यांनी साधला अचूक ‘निशाणा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:48 AM2017-12-09T00:48:34+5:302017-12-09T00:48:38+5:30
गेली कित्येक वर्षे पडीक असलेल्या अंबरनाथमधील शूटिंग रेंज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला आहे. या शूटिंग रेंजचे भूमिपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदे
अंबरनाथ : गेली कित्येक वर्षे पडीक असलेल्या अंबरनाथमधील शूटिंग रेंज पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला आहे. या शूटिंग रेंजचे भूमिपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी रायफलचा वापर करून पालकमंत्र्यांनी अचूक निशाणा साधला.
अंबरनाथ विम्कोनाका पसिसरात अंबरनाथ पालिकेचे शूटिंग रेंज होते. १९९८ पासून ते बंद होते. या शूटिंग रेंजचा वापर होत नसल्याने ही जागा पडीक होती. या ठिकाणी पुन्हा रेंज सुरू करण्यासाठी सुचिता देसाई यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर, पालिकेने सव्वा कोटीचा प्रकल्प आराखडा तयार करत या कामाला मंजुरी दिली.
या शूटिंग रेंजच्या जागेची स्वच्छता करून त्या ठिकाणी नव्याने शूटिंग रेंज सुरू करण्यात येणार आहे. अंबरनाथमधील राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्रित कसे येतात, हे पाहण्यासाठी इतर राजकीय मंडळींनी अंबरनाथमध्ये यावे. विकासाच्या मुद्यावर अंबरनाथकर एकत्रित येतात, ही चांगली बाब आहे. यापुढेही वेगाने शहरातील प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. अंबरनाथमध्ये जे उपक्रम सुरू आहेत, त्यामुळे हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून पुढे येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार शिंदे यांच्या पुढकारातून हा प्रकल्प मूर्त स्वरूप घेत असून येत्या १० महिन्यांत ते काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शूटिंग रेंजसोबत नेताजी मैदानाचेही भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानाचे सपाटीकरण करून लवकरच त्या मैदानाचेही काम सुरू करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.