पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के महाडमधील तळीये गावी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:30+5:302021-07-24T04:23:30+5:30
ठाणे : रायगडमधील महाड तळीये गावामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची बातमी कळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर ...
ठाणे : रायगडमधील महाड तळीये गावामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची बातमी कळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के हे ठाणे आपत्ती प्रतिसाद (टीडीआरएफ) दलाच्या पथकासह शुक्रवारी घटनास्थळी दाखल झाले.
गेल्या चार दिवसांपासून कोकण विभागात मुसळधार पाऊस होत आहे. शुक्रवारी सकाळी महाडमधील तळीये गावामध्ये दरड कोसळून यामध्ये काही रहिवासी बाधित झाले आहेत. यामध्ये अंदाजे ३२ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही माहिती मिळताच बचावकार्य करण्याच्या दृष्टीने ठाणे आपत्ती प्रतिसाद दलासह पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के हे घटनास्थळी रवाना झाले. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापनास घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले. त्यानुसार, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे १२ प्रतिसादक, १ वाहनचालक, १ मिनीबस शुक्रवारी दुपारी रवाना झाले आहेत.