भाईंदर: होळीसाठी हिरव्यागार झाडांच्या फांद्या तसेच सुकी लाकडे मोठ्या प्रमाणात वापरली जाऊन वृक्ष व पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते; पण मुंबईसह मीरा-भार्इंदरमधील २५ ठिकाणी यंदा होलिका दहनासाठी शेणापासून बनवल्या गेलेल्या लाकडांचा अर्थात गोकाष्ठचा वापर केला गेला. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी केशवसृष्टीतील गोशाळेत पहिल्यांदाच शेणापासून लाकडाच्या आकारांचे जळाऊ इंधन तयार केले गेले. पहिल्याच वर्षी तब्बल दीड लाख नगांची मागणी होती; पण केवळ दहा हजार नगच शेणाची लाकडे तयार केली गेली होती. पुढील वर्षी मात्र आधीपासूनच तयारी करणार असल्याचे केशवसृष्टीच्या वतीने सांगण्यात आले.
भाईंदरच्या उत्तन येथील केशवसृष्टीमधील गोशाळेत २३० गोवंश आहेत. त्यातून रोज तीन टन इतके शेण निघते. जयपूर, कोलकाता, नागपूर आदी ठिकाणी लाकडांऐवजी शेणाचा वापर करून लाकडांच्या आकाराचे जळाऊ इंधन तयार केले जात असल्याचे गोशाळा व्यवस्थापनाच्या वाचनात आले होते.
शेणाचा वापर पूजा आदी विविध धार्मिक कार्यात केला जात असल्याने होळी दहनासाठी लाकडांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर पाहता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शेणाची लाकडे निर्मितीचा संकल्प गोशाळेच्या व्यवस्थापन मंडळातील अध्यक्ष देवकीनंदन जिंदल, सचिव तथा नगरसेवक डॉ. सुशील अग्रवाल, व्यवस्थापक माधव सोनुणे आदीनी केला होता. जानेवारीत केशवसृष्टी येथे महापूजेच्या वेळी या शेणाच्या लाकूडनिर्मितीचा प्रारंभ करण्यात आला होता.
भारत विकास परिषदेच्या सहकार्याने यंत्राचा वापर करून दहा हजार नग शेणाची लाकडे यंदा तयार केली गेली. सुमारे दोन फूट लांब व ९०० ग्रॅम ते एक किलो वजनाच्या या शेणाच्या लाकडाच्या नगाची किंमत नाममात्र दहा रुपये ठेवण्यात आली. होळी दहनासाठी शेणाची लाकडे उपलब्ध असल्याचे कळल्यावर शहरातून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी सुरू झाली. तब्बल दीड लाखपर्यंतची मागणी शेणाच्या लाकडांसाठी आली होती; परंतु केवळ दहा हजार नगांची निर्मिती झालेली असल्याने गोशाळेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करून पुढीलवर्षीच्या होळीसाठी सर्वांनाच शेणाची लाकडे मिळतील, असे प्रयत्न करणार असल्याचे आश्वस्त करण्यात आले आहे.यंदा मीरा-भार्इंदरमधील बालाजी नगर, सालासर ब्रजभूमी, मोदी पटेल मार्ग, कस्तुरी पार्क, पद्मावती नगर, शिवसेना गल्ली, ओम साई कॉम्प्लॅक्स, गोल्डन नेस्ट फेज २ व १४, सद्गुरू कॉम्प्लॅक्स, प्रथमेश हाइट्स आदी १८ ठिकाणी तसेच मुंबईतील बोरीवली, मुलुंड, अंधेरी आदी ठिकाणीही शेणाच्या लाकडांनी होलिका दहन केले गेले. तर या शेणाच्या लाकडांचा वापर केवळ होळीसाठीच नव्हे तर होमहवन, अंत्यविधी आदी धार्मिक कार्यासाठी करता येणे शक्य आहे. जयपूर आदी काही ठिकाणी या गोकाष्ठांचा वापर अंत्यविधीसाठी होत असल्याने येथे वापर करण्यासाठी डॉ. अग्रवाल यांनी महापौर व आयुक्तांना पत्र दिले आहे.गोशाळेत गोबर गॅसच्या उपयोगा व्यतिरिक्त शेणसाठा शिल्लक राहायचा. आता मात्र शेणाची लाकडे बनवण्यास सुरुवात केल्याने शेण पूर्णपणे वापरात येत आहे. शेणाची लाकडे बनवल्याने वृक्षांची तोड व लाकडे जाळण्याचे कमी होऊन पर्यावरणाचे मोठे संवर्धन - संरक्षण होणार आहे. - डॉ. सुशील अग्रवाल, सचिव, गोशाळा