ठाणे : नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हलर इंडिया आणि यूएस काँन्स्युलेट जनरल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील हौशी छायाचित्रकर हनिफ तडवी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
‘महिला सुरक्षा आणि सबलीकरण’ या विषयावर स्पर्धा आयोजिली होती. त्यात भारतातून हजारो छायाचित्रकार सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण अमेरिकेचे डेव्हिड रांझ, नाटककार संजना कपूर, नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनचे करीना जिनानी, बॉलीवूड अभिनेते कैजाद कोटवाल यांनी केले.
या स्पर्धेत तडवी यांनी नर्मदा खोऱ्यातील मणीबेली गावातील मुलींचे शाळेत जाण्यासाठी होडीने प्रवास करतानाचे छायाचित्र पाठविले होते. त्यांनी या छायाचित्रात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या ‘नर्मदा बचाव’ आंदोलनातील मणीबेली शाळेचा प्रवास टिपला. एका गावातून दुसऱ्या गावात शाळेत जाण्यासाठी बोटीने कराव्या लागणाऱ्या प्रवासाची कहाणी थक्क करणारी आहे. तडवी हे हौशी छायाचित्रकार असून, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्मचारी आहेत. त्यांना या पूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.