हनुमंतराव दोडके प्रभारी गटविकास अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:18 AM2021-02-28T05:18:52+5:302021-02-28T05:18:52+5:30
शहापूर : शहापूर पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी (बीडीओ) म्हणून हनुमंतराव दोडके यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. गटविकास अधिकारी ...
शहापूर : शहापूर पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी (बीडीओ) म्हणून हनुमंतराव दोडके यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
गटविकास अधिकारी अशोक भवारी हे वादग्रस्त ठरले होते. पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्यांना विश्वसात न घेता ते मनमानी करत होते. पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या निषेधार्थ आंदोलन पुकारले होते. १५ वा वित्त आयोगाचा आराखडा न बनविणे, तसेच सभापती, उपसभापती व सदस्यांना विश्वासात न घेणे, अशा तक्रारी सर्व सदस्यांनी केल्या होत्या. ते अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवत त्यांच्या बदलीचा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत सर्व सदस्यांनी एकमुखाने घेतला होता; परंतु त्यावर कार्यवाही होत नसल्याने सभापती रेश्मा मेमाणे, उपसभापती जगन पस्टे, गटनेते सुभाष हरड, दशरथ भोईर, स्नेहल शिंगे, पद्माकर वेखंडे, एकनाथ भला, प्रकाश वीर आदींसह सर्व सदस्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची १७ फेब्रुवारीला भेट घेऊन निवेदन दिले होते.
२६ फेब्रुवारीला शहापूर पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकून उपोषण करण्याचा सर्व सदस्यांनी निर्णय घेतला होता.
त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते यांना २५ फेब्रुवारीला शहापूर पंचायत समितीमध्ये चौकशीसाठी पाठवून सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून दोडके यांची नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भवारी हे स्वतःहून रजेवर गेले आहेत का किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
--------------