लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपी फरार आहेत. दोन हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणातील विकी गोस्वामी आणि त्याची मैत्रिण अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्यासह विविध गुन्ह्यांमधील एक हजार ४९९ आरोपी हे गेल्या काही वर्षांपासून फरार आहेत. मात्र, वर्षभरात अशा शंभराहून अधिक गुन्हेगारांना पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशभरात गाजलेल्या इफेड्रीन प्रकरणामुळे ठाणे पोलीस प्रसिद्धीच्या झोतात आले. इफेड्रीनची निर्मिती करणाऱ्या सोेलापूर एमआयडीसीतील कारखान्यावर छापा टाकून ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने १५ आरोपींना अटक केली. मात्र, यातील मुख्य आरोपी विकी गोस्वामी आणि त्याची मैत्रिण ममता कुलकर्णी, डॉ. अब्दुल्ला व त्याचे दोन साथीदार, असे पाच आरोपी अद्यापही ‘वाँटेड’ आहेत.
त्याचबरोबर राबोडीतील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची २४ नोव्हेंबर २०२० ला गोळी झाडून हत्या करणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. त्यातील मुख्य सूत्रधार मात्र अद्यापही फरारी आहे.
* २५ वर्षांपासून गुंगारा
जबरी चोरीतील आरोपीने १९९० मध्ये उल्हासनगर येथे नितीन पाटील या पोलीस अधिकाऱ्याचा चॉपरने खून केला. या खुनातील आराेपीला पकडण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे पथक २०१७ मध्ये दिल्लीत धडकले. मात्र, २०१२ मध्येच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले.
* मृत्यूनंतरही तपास
नितीन पाटील हत्याकांडातील आरोपी मृत्यू पावला तरी तो मृत्यू पावला आहे का? की यातही बनाव आहे? याची खातरजमा होईपर्यंत, अशा प्रकरणाचाही तपास सुरू असतो, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
* १५ वर्षांपासून पसार
मिलिंद पटेल, राजेश चव्हाण, बाबूलाल जयस्वाल, सलिम सय्यद या खुनातील आरोपींचा कळवा पोलीस गेल्या १५ वर्षांपासून शोध घेत आहेत.
-----------
फरार आरोपींचा गुन्हे अन्वेषण विभागांच्या पथकांसह स्थानिक पोलिसांकडूनही माग काढला जातो. आरोपी नाही सापडले तर जाहीरनामा काढून त्यांची मालमत्ताही जप्त केली जाते. फरारी आरोपी मिळेपर्यंत चिवटपणे पाठपुरावा केला जातो.
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर.
--------------
परिमंडळ - फरार आरोपी
अ- ठाणे शहर - ३२८
ब- भिवंडी-२१५
क- कल्याण-३४०
ड- उल्हासनगर-३६६
इ- वागळे इस्टेट-२५०
---------------