फेरीवाला धोरणाची नव्या वर्षात होणार अंमलबजावणी, तीन वर्षापूर्वी गठीत केलेली समितीच पाहणार काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:48 PM2017-12-06T15:48:32+5:302017-12-06T15:54:45+5:30
ठाणे महापालिकेचे फेरीवाला धोरण आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. तीन वर्षापूर्वी गठीत केलेली समिती याचे काम पाहणार असून, शहरात आजच्या घडीला सात हजार फेरीवाले आहेत.
ठाणे - फेरीवाला धोरणासंदर्भात उच्च न्यायालयाने ज्या महापालिकांनी यापूर्वी समिती गठीत केली असेल त्यानुसारच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिका आता २०१४ मध्ये गठीत केलेल्या समितीनुसार काम करणार आहे. याबाबत आयुक्तांकडे तसा संबधींत विभागाकडून पत्र व्यवहार करण्यात आला असून आता लवकरच फेरीवाला धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
ठाणे महापालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरवात होती. आता फेरीवाल्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हे देखील पूर्ण झाला आहे. या सर्व्हेनुसार शहरात सुमारे ७ हजारांच्या आसपास फेरीवाले आहेत. पालिका आता, या फेरीवाल्यांकडून रजिस्ट्रेशनची फी आकारुन त्यांना जागा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे पालिकेने मागील साडेतीन वर्षात शासनाच्या बदललेल्या नियमानुसार दोन वेळा सर्व्हे केला. त्यानंतर आता फेरीवाला समिती गठीत करण्यासाठीचा आध्यादेश पुढे आल्याने पालिकेने त्याची तयारी सुरु केली होती. या समितीमध्ये जवळ जवळ विविध प्रकारचे सदस्य मिळाले असून ही समिती देखील गठीत करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. आता फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यासाठी, शासनाने अॅप देखील देऊ केला आहे. परंतु अद्यापही तो अॅप पालिकेला मिळालेला नाही.
दरम्यान आता उच्च न्यायालयानेच शासनाचे कान टोचले असून ज्या महापालिकांनी यापूर्वी सर्व्हे केला असेल आणि ज्यांनी समिती गठीत केली असेल त्यानुसारच पुढील कामकाज केले जावे असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता ठाणे महापालिकेने २०१४ मध्ये गठीत केलेली समिती पुर्नगठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. हीच समिती आता काम पाहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार या समितीची बैठक घेण्याबाबत संबधींत विभागाने महापालिका आयुक्तांना पत्र देखील दिले आहे. त्यानुसार आता येत्या काही दिवसात या समितीची बैठक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान फेरीवाल्यांचा यापूर्वीच बायोमेट्रीक सर्व्हे झालेला असून त्यानुसार शहरात आजच्या घडीला ७ हजारांच्या आसपास फेरीवाले आहेत. तोच सर्व्हे आता ग्राह्यधरला जाणार असून, शहरात जे उर्वरित शिल्लक राहिलेले फेरीवाले असतील त्यांचा सर्व्हे केला जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. यासाठी शासनाच्या अॅपची मदत घेतली जाणार आहे. एकूणच नव्या वर्षात आता फेरीवाला धोरण अंतिम होऊन त्यानुसार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार आहे.