डोळ्यादेखत ‘त्याने’ पाहिले दोन भावांचे मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:29+5:302021-05-05T05:06:29+5:30
कल्याण : शहरातील स्थानिक पत्रकार जितेंद्र कानाडे यांच्या दोन भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आपल्या डोळ्यादेखत अचानक दोन भाऊ ...
कल्याण : शहरातील स्थानिक पत्रकार जितेंद्र कानाडे यांच्या दोन भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आपल्या डोळ्यादेखत अचानक दोन भाऊ गेल्याने जितेंद्र तसेच त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जितेंद्र यांना एकूण पाच भाऊ. त्यापैकी महेंद्र कानाडे (रा. आधारवाडी) हेही एक लहान वर्तमानपत्र चालवून त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार. पत्नी गृहिणी, तर एका मुलीचे लग्न झाले आहे. एक मुलगी वकिलीचे शिक्षण घेत आहे. कोरोनाची लागण झाल्याने महेंद्र यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने जितेंद्र यांनी त्यांना आर्ट गॅलरीतील कोविड रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यातून त्यांचे कुटुंब सावरत असतानाच, जितेंद्र यांचा दुसरा भाऊ सुनील यालाही कोरोनाची लागण झाली. त्याच्यावरही आर्ट गॅलरी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी सुनील यांचा टुडी-एको काढण्यास सांगितले. त्यासाठी जितेंद्र यांनी अडीच हजार रुपये भरले. सुनील यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सोमवारपर्यंत चांगली होती. परंतु, अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सुनील हे सुरक्षारक्षकाचे म्हणून काम करत होते. त्यांना दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. अवघ्या १५ हजारांच्या पगारात ते कुटुंबाचा खर्च चालवित होते. आता त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या पंगू झाले आहे.
खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून लूट
- महेंद्र यांना पलावा येथील रुबी रुग्णालयातून कल्याणला हलवताना खासगी रुग्णवाहिकाचालकाने २५ हजारांची मागणी केली होती. त्यामुळे रुग्णांची अशाप्रकारे लूट होत असल्याचा आरोप जितेंद्र यांनी केला आहे.
- आटॅ गॅलरीत उपचारादरम्यान अरुणा पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालकाने आटॅ गॅलरी ते बैलबाजार स्मशानभूमीपर्यंत साडेतीन हजार भाडे मागितले. हे भाडे अरुणा यांच्या जावयाने दिल्याने मृतदेह स्मशानभूमीत पोहोचविला गेला.
- यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, रुग्णवाहिकाचालकांकडून जास्त पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. आरटीओंच्या माध्यमातून चौकशी करून रुग्णवाहिकाचालकांविरोधात कारवाई केली जाईल.
- मनपाकडे १५ रुग्णवाहिका आहेत; तर कोविडकाळासाठी ३४ रुग्णवाहिका भाड्याने घेतल्या आहेत. मग या रुग्णवाहिका रुग्णांना का उपलब्ध होत नाहीत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
------------------