शिक्षकावर खूनी हल्ल्यासाठी मुख्याध्यापकानेच दिली दहा हजारांची सुपारी: तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 07:18 PM2017-12-14T19:18:25+5:302017-12-14T20:04:24+5:30
शिक्षकावर खूनी हल्ल्यासाठी मुख्याध्यापकानेच सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तिघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. यातील सूत्रधार मुख्याध्यापक रमेश मिश्रा हा मात्र अद्यापही पसार आहे.
ठाणे: आपल्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रार करणा-या महाजन प्रजापती या शिक्षकावर खूनी हल्ला करण्यासाठी ठाण्याच्या ज्ञानोदय हिंदी विद्यालयाचा मुख्याध्यापक रमेश मिश्रा यानेच दहा हजारांची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी रोशन सिंग (२०), विशाल मोरे (१९) आणि प्रकाश चाळके (२०) या तिघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
सावरकरनगरातील ज्ञानोदय विद्यालयाचा मुख्याध्यापक मिश्रा याने ३ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला घडवून आणला होता. त्यावेळी प्रजापती यांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरूद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
ज्ञानोदयमध्ये कनिष्ठ शिक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या प्रजापती यांनी मिश्रा यांच्याविरुद्ध शाळेतील गैरव्यवहाराबाबत शिक्षण विभागासह अन्य खात्यांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. मिश्रा हे नऊ वर्षांपासून शाळेत एकही दिवस हजर न राहता केवळ मस्टरवर सह्या करून वेतन घेत असल्याची प्रजापती यांची तक्रार होती. मिश्रा यांचे वागळे इस्टेटमध्ये स्वत:चे विद्यालय असून, त्यांचा शिक्षकांना त्रास असल्याचा गंभीर आरोपही प्रजापती यांच्यासह आणि अन्य तक्रारदारांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी रात्री प्रजापती जेवण झाल्यानंतर सावरकर नगरातील पानाच्या दुकानावर गेले होते. त्याचवेळी चौघांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला होता. तलवारीने केलेल्या मारहाणीत प्रजापती गंभीर जखमी झाले. यावेळी मुख्याध्यापक मिश्राही तिथे होते. याप्रकरणी पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. आंब्रे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश बसवंत यांच्या पथकाने शिक्षकावर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करणारे रोशन आणि विशाल या दोघांना आधी अटक केली. त्यांच्याकडील सखोल चौकशीत चाळके याला गुरुवारी अटक केली. कोणताही धागादोरा नसतांना खबरी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या तिघांनाही अटक केल्याची गिरधर यांनी सांगितले. यातील मुख्य सूत्रधार मुध्याध्यापक मिश्रा हा मात्र अजूनही पसार असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
.......................
हल्लेखोर प्रकाश चाळके यानेच या खूनी हल्ल्यासाठी ही दहा हजारांची सुपारी घेतली. तर रोशनच्या वडीलांचे कॅन्टीन ज्ञानोदय विद्यालयात आहे. त्यामुळे त्याचे या शाळेत येणे जाणे होते. याच ओळखीतून प्रजापतीवर हल्ला करण्यासाठी प्रकाश आणि रोशन यांनी मान्य केल्याची कबूली पोलिसांना दिली.