१० वर्षीय मुलीचा शाळेत विनयभंग; पोलिसांना माहिती न दिल्याने ठाण्यात मुख्याध्यापिकेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 02:51 PM2024-12-05T14:51:01+5:302024-12-05T14:51:37+5:30
ठाण्यात एका मुख्याध्यापिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
Thane Crime : बदलापूर येथील अत्याचार प्रकरण ताजे असतानाच शाळांमधील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. अशाच एका घटनेमध्ये शाळा प्रशासनही योग्य ती कारवाई करत नसल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे. १० वर्षीय मुलीच्या विनयभंगाची तक्रार लपवून तिला धमकावल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी दिवा येथील ४३ वर्षीय शाळेच्या मुख्याध्यापकेला अटक करण्यात आली केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. शाळेत अज्ञात व्यक्तीने १० वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची माहिती मुख्याध्यापिकेने पोलिसांना दिली नसल्याचा आरोप आहे. मुंब्रा परिसरात असलेल्या एका शाळेत मंगळवारी सकाळी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित मुलगी इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी असून ही घटना घडली तेव्हा तिच्या वर्गात ती एकटीच होती. त्यावेळी शॉर्ट्स आणि निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक माणूस तिथे आला. त्याने मुलीचा विनयभंग केला आणि तिच्यावर हल्लाही केला. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला आणि त्यानंतर तो माणूस तिथून निघून गेला.
मुलीचा आवाज ऐकून मुख्याध्यापिका तिथे आल्या आणि त्यांनी पीडितेची विचारपूस केली. त्यानंतर मुख्याध्यापिका पीडित मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीसोबत बोलताना दिसल्या होत्या अशी तक्रार करण्यात आली. आरोपीने पळून जाताना एका शिक्षिकेला मुलीला शाळेत सोडण्यासाठी आलो होतो असं सांगितलं होतं. त्यानंतर मुलीने तिच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.
जेव्हा मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला या घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांनी याविषयी कुटुंबाला सांगू नको असे सांगण्यात आले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहितीही समोर आली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर, मुख्याध्यापिकेला या घटनेबद्दल पोलिसांना माहिती न दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.