आरोग्य केंद्राची दुरवस्था, ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 07:00 AM2017-12-01T07:00:26+5:302017-12-01T07:00:47+5:30
बदलापूर गावात उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. इमारत उभी राहिली असली, तरी कर्मचारीच न आल्याने त्या ठिकाणी रुग्णांना सुविधा मिळत नाही.
बदलापूर : बदलापूर गावात उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. इमारत उभी राहिली असली, तरी कर्मचारीच न आल्याने त्या ठिकाणी रुग्णांना सुविधा मिळत नाही. अपुरे कर्मचारी आणि पाणी नसल्याने प्रसूती बंद करण्यात आलेली आहे. याविरोधात राष्ट्रवादीने गुरुवारी आंदोलन करत या ठिकाणी सुविधा पुरवण्याची मागणी केली. याच रुग्णालयाशेजारी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, ते अद्याप सुरू न झाल्याने त्या प्रशिक्षण केंद्राचे प्रतीकात्मक उद्घाटन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे.
बदलापूर गावात सरकारी निधीतून दोन वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. या आरोग्य केंद्रात नियमित बाह्य रुग्णसेवा सुरू आहे. या केंद्रात पूर्वीपासून प्रसूती विभाग होता. परिसरातील गरीब आणि आदिवासी महिलांसाठी हे केंद्र वरदान मानले जात होते. मात्र, आज परिस्थिती भयाण झाली आहे. या ठिकाणी एकच डॉक्टर असल्याने त्यांच्यामार्फत संपूर्ण आरोग्य केंद्र चालवण्यात येते. जी परिचारिका प्रसूती विभागासाठी देण्यात आली होती, ती लसीकरणासाठी बाहेर जात असल्याने प्रसूती विभागात काम करण्यासाठी परिचारिकाच नाही. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आलेली नळजोडणीही बंद करण्यात आलेली आहे. चार लाखांहून अधिक थकबाकी असल्याने पाण्याअभावी प्रसूती विभागावर त्याचा परिणाम होत आहे. पाणी आणि परिचारिका नाही, अशा परिस्थितीत प्रसूती विभाग चालवणार कसा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती विभाग सुरू व्हावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीने आंदोलन करत डॉक्टरांना तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँॅग्रेस सरकारी पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे शहरप्रमुख कालिदास देशमुख यांनी स्पष्ट केले.
बदलापूर गावातील हे आरोग्य केंद्र आदिवासी आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी नेहमी सोयीचे ठरले आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्या ठिकाणी सुविधा मात्र पुरेशा प्रमाणात पुरवण्यात येत नाहीत. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसोबत रुग्णांना पुरवण्यात येणाºया सुविधांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक गरोदर महिला या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. उपचार केले जात असले, तरी त्यांची प्रसूती या रुग्णालयात करणे शक्य होत नसल्याचे समोर आले आहे.
डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या वाढल्यास सुविधा पुरवणे शक्य होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
त्वरित नळजोडणी देण्याची मागणी
पाण्याचे बिल थकलेले असल्याने या ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही बाब चिंताजनक आहे. आरोग्याशी संबंधित विभाग असल्याने जीवन प्राधिकरणाने योग्य ती कार्यवाही करून त्वरित नळजोडणी देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
केंद्राच्या बाजूलाच असलेल्या प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधून तयार असताना त्याचे उद्घाटन अद्याप न झाल्याने या इमारतीचे प्रतीकात्मक उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. इमारतीचे उद्घाटन व्हावे आणि या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी केली.