भिवंडीतील मोबाइल टॉवर कंपनीला उच्च न्यायालयाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:20+5:302021-03-27T04:42:20+5:30
भिवंडी महापालिका क्षेत्रातील एटीएस कंपनीची व्योम मोबाईल कंपनी प्रसिद्ध आहे. या कंपनीचे शहरात एकूण ६७ मोबाईल टॉवर आहेत. यासाठी ...
भिवंडी महापालिका क्षेत्रातील एटीएस कंपनीची व्योम मोबाईल कंपनी प्रसिद्ध आहे. या कंपनीचे शहरात एकूण ६७ मोबाईल टॉवर आहेत. यासाठी एकूण करापोटी ५ कोटी ५३ लाख १३ हजार रुपयांच्या रकमेचे देयक मोबाईल कंपनीला बजावण्यात आले होते. या कंपनीने कराची रक्कम न भरता भिवंडी पालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र हा दावा सुनावणीला घेण्यापूर्वी मूळ कराची रक्कम ४ कोटी ६३ लाख १५ हजार १५६ रुपये दहा दिवसांत भरण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कंपनीला दिले आहेत. मोबाईल कंपन्या शहरात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता टॉवर उभे करतात आणि कर भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर कंपन्या न्यायालयात धाव घेतात. मात्र या प्रकरणात मूळ कराची रक्कम भरल्याशिवाय सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिल्यामुळे मोबाईल कंपन्यांना चाप बसेल व प्रशासनाला कराची रक्कम वसूल करता येईल असा विश्वास मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केला.