महसूल, पोलीस खात्यामध्ये लाचखोरांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 12:50 AM2021-02-28T00:50:41+5:302021-02-28T00:50:55+5:30
सर्वाधिक ट्रॅप महसूल विभागात : चाळिशीतील कर्मचारी सर्वाधिक
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या दोन महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध १२२ सापळे रचले. यात महसूल आणि पोलीस खाते अव्वल असून, त्यापाठोपाठ महावितरणचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे चाळिशीतील कर्मचारी-अधिकारी यांची संख्या यात मोठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये १२२ सापळे लावले, तर २०२० या संपूर्ण वर्षभरात ६३० सापळे लावण्यात आले. यात बारा अपसंपदा, तर २१ अन्य भ्रष्टाचाराची प्रकरणे होती. ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये नऊ गुन्ह्यांत १२ लाचखोरांना अटक झाली. यात महसूल विभागात २५, पोलीस २५, तर महावितरण कंपनीच्या १६ प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय, महापालिका आठ, जिल्हा परिषद तीन, पंचायत समिती दहा तर वनविभागाच्या पाच प्रकरणांचा समावेश असून, प्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन प्रकरणांचा समावेश आहे.
चाळिशीतील सरकारी अधिकाऱ्यांना पैशाचा मोह
कोरोनामुळे मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या काळात लॉकडाऊन असल्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची वर्दळही कमी होती. त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावलेली होती. त्यामुळेच या कालावधीमध्ये म्हणजे गेल्या दहा महिन्यांत लाचेचा एकही सापळा लागलेला नाही.
मात्र, लॉकडाऊन संपताच जानेवारी २०२१ मध्ये ६८ सापळ्यांमध्ये ९६, तर फेब्रुवारीमध्ये ५३ सापळ्यांमध्ये ७३ जणांना अटक झाली आहे.
वयोगटानुसार आढावा घेतल्यास सर्वाधिक पैशाचा मोह हा चाळिशी ओलांडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना असल्याचे आढळले. २०१९मध्ये ही संख्या ६० तर २०२० मध्ये १६ आणि २०२१च्या दोन महिन्यांमध्ये ४१ ते ५० वयोगटातील चौघा कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक झाली.
त्यापाठोपाठ तिशी ओलांडलेल्या म्हणजे ३१ ते ४० वयोगटातील ६७ लाचखोर पकडले गेले. २०१९मध्ये ३६ तर २०२० मध्ये या वयोगटातील २९ लाचखोर अडकले आहेत.
भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) ध्येय आहे. कोणीही शासकीय अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करीत असेल तर संबंधितांनी एसीबीशी संपर्क साधणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचारी कोणत्याही खात्याचा किंवा वयोगटाचा असो त्यावर कारवाई होईल. यात तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. - डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र