ठाणे कारागृहातील इतिहास म्युरल्सद्वारे होणार जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 01:02 AM2021-02-28T01:02:09+5:302021-02-28T01:02:15+5:30
संजय केळकर यांनी केली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिंदू असलेले अशोक स्तंभ आणि टाऊन हॉलच्या नुतनीकरणानंतर आता ठाणे कारागृहातील क्रांतिकारकांचा इतिहास म्युरल्सद्वारे जिवंत होणार आहे. या संकल्पनेच्या कामास वेग आला असून शुक्रवारी आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कारागृह प्रशासनाच्या अधिका-यांसोबत पाहणी दौरा
केला.
या संयुक्त पाहणी दौ-यात या योजनेची रुपरेषा ठरवण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमार्फत दरवर्षी एक कोटी या प्रमाणे दोन कोटींचा निधी या कामासाठी मिळणार असून सुरुवातीच्या कामासाठी केळकर यांनी आमदार निधीतून २५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
यात वधस्तंभ म्हणजे फाशी गेट येथील लाकडी सामान, खटका आदीच्या मूळ स्वरुपास धक्का न लावता सुशोभित करण्यात येणार आहे. तर येथील ३०० वर्षे जुन्या भिंतींची डागडुजीही पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. येथे डोम उभारून त्याखाली म्युरल्सद्वारे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यासह अनेक क्रांतिकारकांचा इतिहास साकारला जाणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य पूर्व काळातील इतिहास जिवंत होणार आहे.
nवासुदेव बळवंत फडके यांना ज्या दरवाज्यातून बोटीने एडनच्या तुरुंगाकडे रवाना केले, ते ठिकाण सुशोभित करण्यात येणार आहे.
nअंदमानला जाताना स्वा.सावरकरांना या कारागृहात एक दिवस येथील काळा पाणी सेलमध्ये ठेवण्यात आले होते. ज्या दरवाजातून त्यांना बोटीने अंदमानला नेले, ते ठिकाणही जिवंत करण्यात येणार आहे.
n२७ मार्च १७३० साली चिमाजी अप्पांनी या किल्ल्यावर विजय मिळवून या किल्ल्यासह ठाणे परिसर पोर्तुगीजमुक्त केला.
nया तुरुंगात शेकडो क्रांतिकारकांना ठेवले होते. १९१० साली येथे चार क्रांतिकारकांना फाशी दिल्याची शेवटची घटना घडली होती.