मृत्यूनंतरही पालिकेच्या कर्मचाऱ्याची परवड; पैश्यांसाठी अडवून ठेवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 02:40 PM2020-12-27T14:40:05+5:302020-12-27T14:45:02+5:30

२५ दिवसांपासून सुरू असलेला मृत्यूसोबतची झुंज संपुष्टात

hospital refuses to give dead body of patient until family manages to pay bill | मृत्यूनंतरही पालिकेच्या कर्मचाऱ्याची परवड; पैश्यांसाठी अडवून ठेवला मृतदेह

मृत्यूनंतरही पालिकेच्या कर्मचाऱ्याची परवड; पैश्यांसाठी अडवून ठेवला मृतदेह

Next

मीरारोड - कामावर असताना पक्षाघाताचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या मीरा भाईंदर महापालिकेच्या लिपिकाचा २५ दिवसांनी शनिवारी मृत्यू झाला. ह्या काळात पालिकेचे कोणी चौकशीसाठी फिरकले नाही. रुग्णालयाने उपचाराचे सुमारे साडे अकरा लाखांचे बिल केले. बँका बंद असल्याने उर्वरित अडीज लाखांचा बिल साठी धनादेश घेण्यास नकार देत, पैसे भरा तरच मृतदेह देऊ अशी अडवणूक केली. शेवटी नातलग - परिचितांनी एटीएम आदी ठिकाणातून जमवाजमव करून पैसे भरले व मृतदेह ताब्यात घेतला. 

भाईंदरच्या राई गावात राहणारे प्रमोद मोरेश्वर पाटील हे मीरा भाईंदर महापालिकेत लिपिक म्हणून कार्यरत होते. सुमारे ३० वर्ष सेवेत असलेले पाटील हे सध्या पालिकेच्या प्रभाग समिती ३ मध्ये कार्यरत होते. १ डिसेम्बर रोजी महापालिका मुख्यालयात उपायुक्त अजित मुठे यांच्या दालनात बैठकीसाठी ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांना अचानक पक्षाघाताचा झटका आल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना मीरारोडच्या वोक्हार्ड रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. 

पालिका कर्मचाऱ्यांच्या मेडिक्लेम सुविधेमधून २ लाख रुपये मंजूर झाले. परंतु रुग्णालयाचे बिल मात्र खूपच जास्त असल्याने पाटील यांच्या पत्नी अनिता यांनी २३ डिसेम्बर रोजी उपायुक्तांना विनंती अर्ज केला. उपचारासाठी केवळ २ लाख व्यतिरिक्त काहीच मदत झाली नसल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी अपेक्षा अनिता यांनी व्यक्त केली.

परंतु त्यानंतरदेखील पालिकेचा अधिकारी फिरकला तर नाहीच, शिवाय रुग्णालय प्रशासनाला पालिकेच्या बांधकाम परवानगीतील अटीनुसार १० टक्के खाटा राखीव ठेवण्याची अट असताना तसेच बिलात सवलत देण्यासाठीसुद्धा काही प्रयत्न केले नाहीत . 

तब्बल २५ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या प्रमोद पाटील यांची प्राणज्योत शनिवार २६ डिसेम्बर रोजी पहाटे ३ च्या सुमारास मालवली . रुग्णालयाने पाटील यांच्या उपचाराचे सुमारे साडे अकरा लाख रुपये इतके देयक केले होते . त्यातील २ लाख रुपये पालिका मेडिक्लेमचे मंजूर झाले असले तरी त्याची रक्कम मात्र रुग्णालया कडे जमा झाली नव्हती . तर २ लाख ४५ हजार रुपये भरणे शिल्लक होते . त्यामुळे पैसे भरल्या शिवाय मृतदेह देणार नाही असा पावित्रा रुग्णालयाने घेतला . उर्वरित बिलाच्या रकमेचा धनादेश देऊ केला असता तो देखील रुग्णालयाने नाकारला. 

बँका बंद आणि इतके पैसे सकाळी आणायचे कुठून अश्या विवंचनेत कुटुंबीय सापडले . शेवटी भल्या पहाटे नातलग व आप्तेष्टाना उठवून त्यांच्या कडील एटीएम मधून पैसे काढण्यास तसेच रोख मिळेल तसे पैसे गोळा करून २ लाख ४५ हजार रुपये रुग्णालयाला गोळा करून दिले. तरीदेखील मेडिक्लेमचे २ लाख भरा असा तगादा लावला गेला. मग मात्र नातलग आदी संतापल्याने अखेर ७ वाजता मृतदेह देण्यात आल्याचे पाटील यांच्या नातलगांनी सांगितले . ह्या बाबत प्रतिक्रियेसाठी रुग्णालयाशी संपर्क साधला असता, आज रविवार असल्याने व्यवस्थापना मधील कोणी उपस्थित नसल्याचे तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक देता येत नसल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: hospital refuses to give dead body of patient until family manages to pay bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.