मनोरुग्णालयांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:35 AM2019-09-04T01:35:29+5:302019-09-04T01:35:34+5:30
अभ्यासासाठी राज्यस्तरीय समिती : आरोग्यसेवा संचालक अध्यक्ष
ठाणे : प्रादेशिक मनोरुग्णालयांतील मनोरुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी जागतिक स्तरावरील मनोरुग्णालयांमध्ये मिळणारे उपचार व सोयीसुविधा यांचा अभ्यास करून त्या सुविधा राज्यातील मनोरुग्णांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्यस्तरीय अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे.
राज्यात ठाणे, पुणे, रत्नागिरी, नागपूर यांठिकाणी मनोरुग्णालय आहेत. तेथे येणाऱ्या मनोरुग्णांना तसेच, त्यांच्यासमवेत येणाºया नातेवाईकांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळाव्यात असा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी १२ जणांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती जागतिक दर्जाच्या मनोरुग्णालयांमध्ये कोणत्या सोयीसुविधा आहेत त्याचा अभ्यास करणार आहे. लवकरच याची पहिली बैठक घेऊन या सोयी सुविधांबाबत ध्येय धोरणे निश्चित केली जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. समितीत नाडकर्णींसह बोदाडे
या समितीत आयुक्त यांच्यासह सदस्य म्हणून विधानपरिषद सदस्य हेमंत टकले, आरोग्य सेवा संचालक, अतिरिक्त अभियान संचालक (राष्ट्रीय आरोग्य अभियान), सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य), सदस्य म्हणून वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संजय कुमावत, आयपीएचचे डॉ. आनंद नाडकर्णी, टाटा ट्रस्टचे चिकित्सालयीन मानशास्त्रज्ञ डॉ. तस्मिन राजा, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय बोदाडे, पुणे येथील मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अभिजीत फडणीस, नागपूर येथील मनोरुग्णालयाचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मधुमिता बहाले, पुणे येथील मनोरुग्णालयाचे वरिष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. रचना गोस्वामी यांचा सहभाग आहे. समितीने आपला अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या समितीनंतर तरी मनोरुग्णालयांमध्ये योग्य त्या सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी आशा निर्माण झाली आहे.