भिवंडी: तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या डुंगे गावातील खाडी वर बांधण्यात येणाऱ्या छोट्या साकव (उघडीचे) बांधकाम करण्यासाठी ठेकेदाराने चक्क खाडीपात्रात भराव टाकून खाडीपात्र बुजवले आहे. ठेकेदाराने खाडीपात्रात माती भराव टाकल्याने पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जमा झाले असल्याने येथील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एन पावसाळ्यातही शेतकरी पेरणी पासून वंचित राहिले आहेत.त्याचबरोबर या पाण्याचा निचरा होत नसल्याने दोन गावे गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.
डुंगे गावातील खाडीपात्रात छोट्या साकवच्या काँक्रीट बांधकाम मागील महिन्यात सुरू होते. या बांधकामासाठी ठेकेदाराने खाडी पात्रात भराव टाकून खाडीपात्र बंद केला आहे. मागील तीन दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने खाडीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने व भरव टाकल्याने पाण्याचा विसर्ग होत नसल्याने पाणी लगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पसरल्याने शेत जमिनी पाण्याखाली आले आहेत. या भागातील डुंगे,वडघर वडुनवघर येथील शेकडो एकर जमीन पाण्याखाली असून वडघर गावातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जी पणाचा फटका शेतकऱ्यांचं नागरिकांना होत असल्याने या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे