भिवंडी: महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांनाच चारित्र्याच्या संशयावर पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी शहरातील गायत्रीनगर येथे घडली आहे. या हत्येप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
लक्ष्मी रामरतन भारती (३५) असे निर्घृण हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर रामरतन सुखलाल भारती (४०) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. शहरातील गायत्रीनगर परिसरातील एका चाळीत आरोपी रामरतन हा मृतक पत्नी लक्ष्मी हिच्या सोबत राहत होता. आरोपी पती रामरतन हा लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाला होता. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जात असताना तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच या पती - पत्नीमध्ये रोज भांडण होत होते. सोमवारी दोघा पती पत्नी मध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी रामरतन याने पत्नीच्या डोक्यात , चेहऱ्यावर व हातावर लोखंडी अँगलने जोरात मारहाण केली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अधिकच खलावल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी मयत लक्ष्मी हिची मैत्रीण अफसाना अलताफ शेख (२४) हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी पती रामरतन सुखलाल भारती यास अटक केली आहे.