दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची मला सवय नाही, आव्हाडांचा नाईकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 07:20 PM2020-03-10T19:20:21+5:302020-03-10T19:23:04+5:30
प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही.
ठाणे - काही महिन्यांवर आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपा नेते गणेश नाईक यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्यावर टीका केल्यानंतर तेरे बस की बात नही तेरे बापको बोल असे प्रतिआव्हान दिले होते. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची मला सवय नाही, असा टोला त्यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे.
‘प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. उलट मला त्यांची दया आली. आमच्या पक्षात असताना ज्या माणसाचा इतका रुबाब होता, त्याच्यावर आता एखादा अट्टल दारूडा चारचौघात जशी शिवीगाळ करतो तशी वेळ त्यांच्यावर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची नवी मुंबईकरांना आवश्यकता आहे,’ असे आव्हाड म्हणाले.
संबंधित बातम्या
दिल्लीप्रमाणे मुंबईतही दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती : आव्हाड
गणेश नाईकांना पुन्हा डिवचले, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका
'गणेश नाईकांचा छा...छैया बघायला तयार राहा'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
दरम्यान, ‘नवी मुंबई ही नवी मुंबईच राहिली पाहिजे. ती नाईक मुंबई बनता कामा नये. आज ते थेट विरोधात असल्यामुळे माझ्यावर पक्षशिस्तीचं बंधन नाही, जे इतकी वर्ष होतं. माझ्या एका भाषणामुळे ते गटारी पातळीवर उतरले आणि त्यांनी थैय्या केला. आता मी त्यांना भरतनाट्यम, ट्विस्ट, डिस्को, झुंबा, आदिवासी डान्स, कोळी नृत्य, सालसा, लांबाडा, आणि आयटम नाचसुद्धा करायला लावणार आहे. नाहीतरी या पक्षातून त्या पक्षात नाचायची सवय त्यांना आहेच.मी येतोय गणेश नाईक. सराव सुरु करा. मी तुमचा बाप काढणार नाही. पण बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल म्हणून नक्कीच सांगणार,’असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.