मनसेला महाआघाडीत घेतल्यास काँग्रेसची पोलखोल करू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:47 AM2019-02-23T00:47:09+5:302019-02-23T00:47:41+5:30
अबू आझमींचा इशारा : महाआघाडीकडून अद्याप निमंत्रण नाही
भिवंडी : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास उत्तर भारतातील सर्व राज्यांच्या प्रचारांत समाजवादी पक्षातर्फे काँग्रेसची पोलखोल करण्याचा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आसीम आझमी यांनी शुक्रवारी दिला. महाआघाडीकडून अद्याप आपल्याला निमंत्रण आले नाही. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा लढवण्याची घोषणा आझमी यांनी यावेळी केली.
शहरातील एका सभागृहात समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये समाजवादी पक्षाला अद्याप समाविष्ट करून घेतलेले नाही. समाजवादी पक्षाने भिवंडी, मुंबई अथवा नांदेड या तीनपैकी एक जागा मागितली आहे. त्यापैकी भिवंडी लोकसभा हे आमचे पहिले लक्ष्य आहे. आपल्या मागणीचा विचार न झाल्याने समाजवादी पक्ष सहा जागांवर उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे आमच्यावर मतविभाजनाचा आरोप कुणी करू नये. काँग्रेसची सत्ता आली, तरी ‘कंट्रोल’ समाजवादीचाच असेल, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना लगावला.
लष्करामध्ये तीन टक्के मुस्लिम समाजाची भरती केली जाते; पण काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सहा टक्के मुस्लिम मारले गेले. त्यामध्ये काश्मीरच्या मुस्लिम जवानांचा समावेश होता, असे सांगताना अबू आझमी म्हणाले की, काश्मीर आपल्या देशाचा भाग आहे, असे पंतप्रधान समजतात, तर काश्मीरमधील लोकांनादेखील आपले समजायला पाहिजे. प्रत्येक काश्मिरीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी आजमी यांनी यावेळी केली.
जवान शहीद होत असताना सरकारने बघ्याची भूमिका घेण्याऐवजी, पाकिस्तानला नेस्तनाबूत करावे, असे मत आजमी म्हणाले. मी मराठी शिकतो. महाराष्ट्र माझा आहे, असे ते मराठी भाषेच्या एका प्रश्नावर म्हणाले.
मोदींचे समर्थन करणाऱ्या मुलायम सिंग यांच्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, अखिलेश यादव हे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. तिकीटवाटप तेच करणार आहेत, असे सांगून आझमी यांनी या विषयावर पडदा टाकला.