रिक्षात दोनपेक्षा जास्त प्रवासी घेतल्यास उगारू कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:45 PM2020-12-26T23:45:33+5:302020-12-26T23:45:38+5:30
मीरा राेड : भाईंदरमध्ये दोनऐवजी तीन ते चार प्रवासी घेऊन भाडे मात्र वाढीव आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा ...
मीरा राेड : भाईंदरमध्ये दोनऐवजी तीन ते चार प्रवासी घेऊन भाडे मात्र वाढीव आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. या शिवाय रिक्षा स्थानक जाहीर करणे, रिक्षांवर माहितीचा स्टिकर लावणे आदी मुद्द्यांवरही चर्चा झाली.
सरकारने कोरोनाच्या अनुषंगाने रिक्षात दोन प्रवासीच बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाईंदरमध्ये शेअर भाडे घेणाऱ्या रिक्षांमध्ये तीनऐवजी दोन प्रवासी घ्यायचे, म्हणून शेअर भाडे मात्र प्रति प्रवासी ५० टक्के पेक्षा जास्त घेतले जात आहेत. किमान शेअर भाडे १० रुपये होते, पण दोन प्रवासी घ्यायचे, म्हणून किमान शेअर भाडे १५ रुपये केले आहे. त्याप्रमाणेच अंतरानुसार शेअर भाडे वाढविले आहे. उत्तनसाठी तर ३० चे ५० रुपये प्रति प्रवासी केले आहेत.
एकीकडे दोन प्रवासी घ्यायचे, म्हणून भाडे वाढविणाऱ्या अनेक रिक्षाचालकांनी चक्क तीन ते चार प्रवासी घेत, भाडे मात्र जास्तीचेच वसूल करून प्रवाशांची लूट चालविल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. रात्रीच्या वेळी तर सर्रास तीन ते चार प्रवासी भरले जातात. यावरून प्रवाशांसोबत रिक्षाचालकांचे वाद होऊ लागले. मीटरप्रमाणे भाडे नेणे बंधनकारक असताना, मीटर न टाकता मनमानी भाडे सांगितले जाते. याबाबत शुक्रवारी सायंकाळी भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, उपनिरीक्षक एम. जी. पाटील यांच्यासह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, रिक्षाचालक, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, ध्रुवकिशोर पाटील आदींची चर्चा झाली.
यावेळी काही रिक्षाचालकांनी पाटील यांच्यावर राग व्यक्त करत, तुम्ही जुने असून सर्वांना ओळखता, तरीही आमच्याकडे अडचण न सांगता, थेट सरसकट सर्व रिक्षाचालकांवर लूट करत असल्याचे आरोप करता हे योग्य नाही, असे खडे बोल सुनावले. काही रिक्षाचालक जास्त प्रवासी घेतात हे मान्य करत त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही मध्ये येणार नाही, असे संघटनांनी स्पष्ट केले. रेल्वे स्थानकाजवळील सुशोभीकरणाच्या कामामुळे होणारी वाहतूककोंडी, अधिकृत रिक्षा स्थानक करून देणे, बोगस व परवाने नसलेल्या रिक्षांवर कारवाई करणे आदी मुद्देही चर्चेत आले.