रिक्षा भाड्याने दिल्यास चालकाची माहिती पोलिसांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:47 AM2021-09-17T04:47:51+5:302021-09-17T04:47:51+5:30
कल्याण : रिक्षा भाडेतत्त्वावर चालवायला दिल्यास त्या रिक्षाचालकाची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे, अशी सूचना कल्याणमधील रिक्षामालकांना ...
कल्याण : रिक्षा भाडेतत्त्वावर चालवायला दिल्यास त्या रिक्षाचालकाची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे, अशी सूचना कल्याणमधील रिक्षामालकांना पोलिसांनी दिली आहे. रिक्षाचालकांच्या गुन्हेगारीचा प्रत्यय सर्वच ठिकाणी प्रवाशांना येत आहे. त्यात रिक्षांचा वापर गुन्ह्यात सर्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहविभागाच्या निर्देशानुसार ठिकठिकाणी रिक्षाचालक संघटना, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. यात महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेवर मोलाच्या सूचना केल्या जात आहेत.
महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात बुधवारी बैठक झाली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत रिक्षांचा गुन्हेगारीत होणारा वापर टाळणे व रिक्षा व्यवसायात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या चालकांना अटकाव करण्यासाठी रिक्षा परवानाधारक रिक्षाचालकांना सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले. यात रिक्षाचालकांनी रिक्षा व्यवसाय करताना खाकी किंवा पांढरा गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. परवानाधारक रिक्षामालकाने आपली रिक्षा चालकाला भाडेतत्त्वावर चालवायला दिली असल्यास त्या चालकाची माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे. परवानाधारक रिक्षामालकाने आपली रिक्षा विनालायसन्स, बॅज, बेकायदा चालक, अल्पवयीन मुले, व्यसनाधीन चालक यांना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिली आहे, असे पोलीस, आरटीओ तपासणीत निदर्शनास आल्यास संबंधित रिक्षाचा परवाना रद्द करून रिक्षामालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
‘महिलांना सुरक्षितपणे घरी सोडावे’
- रिक्षाचालकांनी बेकायदा, अपप्रवृत्ती रिक्षाचालकांची तसेच संशयास्पद व्यक्ती, घटना याबद्दलची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे. माहिती देणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव गुप्त राखले जाईल. रात्री- अपरात्री एकट्या महिला प्रवासी यांना सुरक्षित त्यांच्या घरी सोडण्यास मदत करावी.
- सार्वजनिक ठिकाणी रोडरोमिओ अथवा टवाळखोरांनी महिलेची टिंगलटवाळी अथवा छेड काढली किंवा संशयास्पद वर्तन करत असेल तर नागरिकांच्या मदतीने त्याला विरोध करून त्वरित संबंधित पोलीस ठाण्यात त्या घटनेची खबर द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीत रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी व रिक्षास्टॅण्ड पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------------------