खबरदार लॉकडाऊन कराल तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:13 AM2020-06-22T00:13:16+5:302020-06-22T00:13:24+5:30
वस्तू घेण्यासाठी नागरिकांचे हाल झाले. त्यांना दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागल्या. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. देशात अस्थिरतेचे वातावरण पसरले.
मुरलीधर भवार
कल्याण : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यावर सर्व व्यवहार ठप्प झाले. वस्तू घेण्यासाठी नागरिकांचे हाल झाले. त्यांना दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागल्या. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. देशात अस्थिरतेचे वातावरण पसरले. मात्र काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी ‘अनलॉक १’ ची घोषणा करुन जीवन आता कुठे पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांकडूनच कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन होणार असे वातावरण तयार केले जात असल्याने सर्वसामान्य पुन्हा धास्तावला आहे. कोरोनासोबत जगायचे असे सांगितले जात असताना पुन्हा लॉकडाऊन कशासाठी असा सवाल ते विचारत आहेत. यामागे राजकीय नेते, व्यापाºयांचे साटेलोटे तर नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे.
दरम्यान, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही राजकीय नेत्यांनी लॉकडाऊनसाठी आग्रह धरला आहे. ८ जूनपासून जीवन पूर्वपदावर येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले. मग व्यापाºयांनाही पुन्हा लॉकडाऊन होणार अशी पुडी सोडली. किराणा व अत्यावश्यक वस्तू खरेदी करा, असे दुकानदारच सांगू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत. बहुतांश दुकाने सुरु केल्याने नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडला. त्यामुळेच पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी चर्चा किराणा व्यापाºयांकडून केल्या जात आहेत. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधताना पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत कल्याण- डोंबिवलीत रुग्ण संख्या वाढल्याचे कारण पुढे करत लोकप्रतिनिधींनी पुन्हा लॉकडाऊनची मागणी केली. यातून राजकीय नेते व व्यापारी यांचे उखळ पांढरे होण्याचा वास येत आहे. राजकीय नेत्यांनी नागरिकांना वाटण्यासाठी मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केले. त्यामुळे एका दुकानदाराने सांगितले की, दिवाळीत जितका किराणा विकला जात नाही, त्याच्या कितीतरी पटीने किराणा विकला गेला. लॉकडाऊन ही किराणा दुकानदारांसाठी ‘दिवाळी’ ठरली. दिल्ली, बेंगळुरु, कोलकाता सारख्या शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू केलेला नाही. कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या १८ लाख असून एकूण लोकसंख्येपैकी २५० ते ३०० रुग्ण दिवसाला आढळत असतील तर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आढळणारे रुग्णांचे प्रमाण ०.१३ ते ०.१५ टक्के इतके आहे.
।व्यापारी व नागरिकांच्या हितासाठी किमान १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन घेणे गरजेचे आहे.
- विजय पंडित, अध्यक्ष, कल्याण व्यापारी संघटना
।कोरोना केवळ कपडे व सोने-चांदीच्या दुकानांतून पसरत नाही. त्यामुळे लॉकडाऊन लागू केल्यास त्यात भेदभाव नसावा. किराणा दुकानातून पावभाजी, केक तयार करण्यासाठी साहित्य खरेदीसाठी गर्दी आहे. त्यातून कोरोना पसरत नाही का? शंभर टक्के लॉकडाऊन केल्यास विरोध नाही. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कुणालाही सूट दिली जाऊ नये.
- राकेश मुथा, कपड्याचे व्यापारी