- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ भाजी मार्केट येथील महापालिका शाळा भूखंडावर अवैध आरसीसी बांधकाम होत असल्याची तक्रार भाजपा नगरसेविका कविता गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली. शहरात विनापरवाना शेकडो बहुमजली आरसीसीचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप केल्याने अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला.
उल्हासनगर अवैध बांधकामासाठी कुप्रसिद्ध असून शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला. अशावेळी विनापरवाना व अवैध बांधकामाला आळा बसण्या ऐवजी शेकडो अवैध बांधकामे उभी राहत आहेत. शहर विकास कामासाठी आक्रमक होणारे सर्व पक्षीय नगरसेवक अवैध बांधकामाबाबत मात्र मुंग गिळून आहेत. विनापरवाना उभी राहत असलेली बांधकामे निकृष्ट असून काही वर्षात धोकादायक होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जाणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. भाजपाच्या कविता गायकवाड यांनी हिंमत दाखवीत कॅम्प नं-५ भाजी मार्केट येथील महापालिका शाळा भूखंडावर आरसीसी व्यापारी गाळे बांधले जात असल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केली. भूमाफियांचा तावडीतून शाळेचे भूखंड तरी वाचवी. अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
शहरातील खुल्या जागा, पालिका भूखंडावर भूमाफियांची नजर असून महापालिकेने अवैध बांधकाम विरोधात कारवाईची मोहीम उघडावी. अशी मागणी नगरसेविका गायकवाड यांनी निवेदनात केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने १० वर्ष जुन्या इमारतींना स्ट्रॅक्टरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या. तर दुसरीकडे कॅम्प नं-३ येथील संत कंवाराम चौक शेजारील जुन्या इमारतीवर दोन मजले विना परवाना बांधण्यात येत आहे. कॅम्प नं-५ मधील मुख्य मार्केट रस्त्यावरील दूध नाका येथेही बहुमजली बांधकाम होत आहे. अशी शेकडो बांधकामे उभी राहत असताना, अवैध बांधकामे निष्कासित करण्याची जबाबदारी असणारे प्रभाग समिती अधिकारी, संबंधित उपायुक्त, अतिक्रमण विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत महापालिका उपायुक्त प्रियांका रजपूत यांच्याशी संपर्क केला असता, झाला नाही.