मीरा रोड : मीरा- भाईंदर महापालिकेच्या रामदेव पार्क परिसरातील आरक्षण क्रमांक २३० या भूखंडावर ‘हरित क्षेत्र’ विकास प्रकल्पांतर्गत अमृत वन योजना राबवली आहे. मात्र, या आरक्षणात काही झोपड्यांचीही उभारणी झालेली आहे. या झोपड्या हटवण्यासह अमृतवनमधील उगवलेले गवत- झुडपे काढण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे केली आहे.
महापालिकेने शासनाच्या अमृत वनअंतर्गत रामदेव पार्क भागातील आरक्षण क्र. २३० मध्ये देशी प्रजातीची झाडे लावली होती. मध्यंतरी झाडांना पाणी न घातल्याने ती सुकून मरत असल्याचा प्रकार उघड झाला हाेता. सध्या या अमृत वनमध्ये झुडपे, गवत वाढले असून लावलेली झाडे किती जगली व मोठी झाली हे कळत नसल्याचे स्थानिक रहिवासी मनोज राणे म्हणाले. या आरक्षणालगत जागा असलेल्या खाजगी विकासकाने त्याच्या बांधकाम प्रकल्पासाठी आणलेल्या मजुरांसाठी चक्क पालिकेच्या आरक्षणाच्या जागेत घुसखोरी करून काही बेकायदा झोपड्या बांधल्या आहेत, असे राणे यांनी सांगितले.
हरित क्षेत्र विकसित करण्याची नितांत आवश्यकता असताना महापालिका अमृत वन योजनेच्या आड आरक्षणात बेकायदा झोपड्या बांधू देत आहे. लागवड झालेल्या झाडांची देखभालही केली जात नाही. झाडांच्या मध्येच झोपडपट्टी उभारलेली आहे. याप्रकरणी झोपड्या हटवून झुडपे काढावीत. झोपड्या बांधणारे व त्यास संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे राणे म्हणाले.