भिवंडी शहरात सुधारणा, ग्रामीणमध्ये चिंतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 01:04 AM2020-08-02T01:04:57+5:302020-08-02T01:05:08+5:30
प्रशासनाकडून उपाययोजना। रुग्णवाढ दुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर
भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह पालिका प्रशासनाला यश आले आहे. भिवंडीतील रुग्णवाढदुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर आला आहे. मात्र, ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने तेथे परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारने जुलैमध्ये भिवंडी पालिकेच्या आयुक्तपदी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती केली. त्यांनी राबवलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलैच्या अखेरीस दिसून आला.
आज शहरातील अनेक खासगी कोविड रुग्णालयांत बेड रिकामे होत आहेत. त्याचबरोबर रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कंबर कसली असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.
तर, ग्रामीण भागातील रुग्णांना सुरुवातीपासून रुग्णालयात दाखल होण्यापासून उपचार मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात यशस्वी न झाल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती सुधारलेली
नाही.
येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात ३०० बेडचे कोविड सेंटर सुरू होणार असून कोनगाव येथे २०० तर काल्हेर येथे १०० बेडसह सवाद येथे ७०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे हीच कोविड सेंटर आधीपासूनच सुरू केली असती, तर ही परिस्थिती आली नसती. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने तेथील रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शहरात मृत्युदर ५.४४ टक्के
दरम्यान, शहरातील रुग्णवाढीचा वेग मंदावला असून रुग्णदुपटीचा कालावधी ६५ दिवसांवर पोहोचला, तर शहरातील मृत्युदर ५.४४ टक्के तर ग्रामीण भागात मृत्युदर ३.१२ टक्के आहे. दरम्यान, ‘जून महिन्यात झालेल्या मृत्यूंची संख्या जुलै महिन्यात मिळाली असल्याने जुलै महिन्यात मृत्यूंच्या संख्येत वाढ दिसत आहे. मात्र, जुलैपासून कोरोना रुग्णसंख्या रोखण्यात व मृत्युदर कमी करण्यात मनपासह आरोग्य यंत्रणेला नक्कीच यश आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोकाशी यांनी दिली.