उल्हासनगर : शहरातील एका आरक्षित भूखंडावर अवैधपणे पार्किंग सुरू असल्याचा पाठपुरावा मनसे पदाधिकाऱ्याला भारी पडला असून देशमुख यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगरातील आरक्षित भूखंड भूमाफियांच्या घशात जात असून याला राजकीय पक्ष नेते विरोध होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कॅम्प नं-१ येथील आरक्षित भूखंडावर मुलांना खेळण्यासाठी मैदान व्हावे. यासाठी मनसेचे पदाधिकारी योगीराज देशमुख प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व महापालिकेकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. दरम्यान या भूखंडावर काही जणांनी पार्किंग सुरू केली. दरम्यान देशमुख यांच्या पाठपुराव्याच्या रागातून गुरवारी कल्याण मुरबाड रस्त्यावरील चांद मटण दुकाना समोर रात्री साडे दहा वाजता अमित फुंदे, अक्षय आंधळे, एक रिक्षा चालक व एका अनोळखी इसमाने देशमुख यांना गाठून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. मारहाणीत योगीराज देशमुख जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आरक्षित भूखंडाचा पाठपुरावा का करतो. असे म्हणून चौघांनी देशमुख यांना जबर मारहाण केली. मुंबई येथील मनसे नेते देशपांडे यांच्या मारहाणीनंतर शहरातील योगीराज देशमुख यांच्या मारहाणीचा मनसे पक्षाकडून निषेध व्यक्त होऊन कारवाईची मागणी होत आहे. शहरातील आरक्षित भूखंड भूमाफियांच्या घशात जात असून याबाबत महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. तर तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय यांच्या अंतर्गत शहरातील जागा येत असून त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. सनद रद्द झाल्यानंतरही ६ मजली इमारत कॅम्प नं-५ परिसरात उभी राहिल्याची खमंग चर्चा होत असताना, वालधुनीनदी किनाऱ्यावरील रेल्वे स्टेशन शेजारील खुल्या जागेवर अतिक्रमण होत असल्या बाबत प्रांत कार्यालयाने तहसिलदार कार्यालयाला पत्र पाठविले आहे.
संगनमताने भूखंड घशात?महापालिका अधिकारी, प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालय अधिकारी, भूमाफिया, राजकीय पक्षाचे नेते व बांधकामे व्यावसायिक संगनमत करून आरक्षित भूखंड घशाखाली घालत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. याबाबत राज्य शासनाने चौकशी करण्याच्या मागणीने शहरात जोर धरला आहे.