सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३, साधुबेला शाळेजवळील शिवपॅलेस इमारतीच्या पहिल्या मजल्याची दुरुस्ती विनापरवाना सुरू असताना बाल्कनी कोसळून एका कामगारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उल्हासनगरातील कॅम्प नं-१, साधुबेला शाळेजवळ ३ मजल्याची शिवपॅलेस नावाची २५ वर्ष जुनी इमारत आहे. गेल्या काही दिवसांपासून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या चावला कुटुंबानी विनापरवाना फ्लॅटच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. बुधवारी दुपारी ३ वाजता बाल्कनी तोडण्याचे काम सुरू असताना, कामगार सैरुद्दीन शेख खाली पडून त्याच्या अंगावर बाल्कनी कोसळली. या दुर्घटनेत सैरुद्दीन शेख याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला. मृत झालेला कामगार बिहार राज्यातील राहणारा असून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्याची मागणी होत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सहायक आयुक्त अनिल खतूरानी यांनी महापालिका पथकासह इमारतीची पाहणी केली. झालेल्या दुर्घटने बाबत इमारतीला स्ट्रॅक्टरल ऑडिटची नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती खतूरानी यांनी दिली.
उल्हासनगर पोलिसांनी दुर्घटना झालेल्या इमारतीची पाहणी करून, दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या पहिल्या मजल्याचे फ्लॅटधारक चावला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसरीकडे इमारती शेजारील नागरिकांनी सहायक आयुक्त अनिल खतूरानी यांना साकडे घालुन इमारती मधील नागरिकांच्या तक्रारी केल्या. इमारती मध्ये केंव्हाही दुरुस्तीचे काम सुरू केले जात असल्याने, इमारती खालुन जाणे-येणे धोकादायक झाल्याचे, नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख हे गुरवारी इमारतीची पाहणी करणार असल्याचे समजते.