ठाण्यात अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनाचे उद्घाटन, आजपासून सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:26 PM2018-01-20T13:26:00+5:302018-01-20T14:24:53+5:30
ठाण्यात आजपासून अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनास सुरुवात झाली आहे. देश विदेशातील व्यंगचित्रकार यात सहभागी झाले आहेत.
ठाणे : कार्टूनिस्ट कंबाईन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनाचे शनिवारी सकाळी पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृह येथे आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या उपस्थितीत उद्धाटन झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, चारुहास पंडीत, परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आदी उपस्थित होते.
शनिवार 20 आणि रविवार 21 जानेवारी असे दोन दिवस रंगणा:या संमेलनास आजपासून सुरूवात झाली. यात व्यंगचित्रकारांच्या ओळखी, भेटी व परिचय असा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. यात परिसंवाद, मनोरंजनात्मक कार्यक्रम, भव्य प्रदर्शन असा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे. ज्ञानदेव सभागृह व कचराळी तलाव या दोन ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले आहे. आज दुपारी 2 ते 4.30. यावेळेत ज्ञानराज सभागृह, पाचपाखाडी येथे महिलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा होणार असून यात वैजनाथ दुलंगे व राधा गावडे मार्गदर्शन करणार आहेत. सायं. 4.30 ते 7.15 यावेळेत कचराळी तलाव येथे व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके हा कार्यक्रम होणार असून यात अरविंद गाडेकर, सुरेश क्षीरसागर, वैजनाथ दुलंगे, विवेक प्रभूकेळुस्कर, संजय मोरे, उमेश चारोळे, भटू बगाले, विनय चणोकर यांचा सहभाग आहे. सायं. 7.30 ते 8.30 येथे सोशल मीडिया व व्यंगचित्रे या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्ञानराज सभागृह येथे रात्री 9.45 ते 10.30 यावेळेत निमंत्रितांसाठी मनोरंजनाचा तुफान विनोदी कार्यक्रम होणार आहे. देश-विदेशातील सुमारे 73 व्यंगचित्रकार यांचा संमेलनात प्रत्यक्ष सहभाग आहे. या संमेलनाच्या निमित्ताने जवळपास 550 व्यंगचित्र प्रदर्शनात पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची अप्रकाशित सामाजिक चित्र रसिकांना पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 यावेळेत ज्ञानराज सभागृहामध्ये सुरू असेल. आज सायंकाळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, ठाणो जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. संजय केळकर, महापौर मीनाक्षी शिंदे आदी संमेलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली. रविवारी मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ सोहळा होणार आहे.