सदानंद नाईक/ उल्हासनगर : महापालिका परिवहन ई-बससेवा व सिंधूभवनचे लोकार्पण बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आदींच्या हस्ते रविवारी झाले. प्रमुख पाहुणे तब्बल अड्डीच तास उशिराने आल्याने, महापालिका अधिकारी व नागरिक भरउन्हात ताटकळत होते.
उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बससेवा, सिंधू भवन लोकार्पण सोहळ्याच्या प्रतिक्षेत होती. अखेर रविवारी शहाड डेपो येथे परिवहन ई-बस सेवा तसेच सिंधुभवन इमारतीचे लोकार्पण बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, शहर अभियंता संदिप जाधव व परिवहन बस विभाग प्रमुख विनोद केणे आदींच्या हस्ते झाले आहे. गुरवारी महापालिका परिवहन बसच्या तिकिटाचे भाडे निश्चित करण्यात आले. किमान १० रुपयात नागरिकांचा गारेगार प्रवास होणार आहे. बस डेपो, चार्जिंग स्टेशन, बस स्टॉप सज्ज असून बसचे मार्गही निश्चित झाले झाले. रस्त्यावरून बस धावणार असल्याने, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
महापालिका सिंधूभवनचे लोकार्पण झाले असून तीन मजली भवनात एक सभागृह आहे. सिंधू संस्कृतीचे वास्तू येथे ठेवण्यात येणार. लोकार्पण नंतर शहरातील रस्त्यावरून बस धावणार असून बस डेपो, चार्जिंग स्टेशन, चालक व वाहक सज्ज आहेत. केंद्राने चार्जिंग स्टेशनसाठी ५ कोटी तर केंद्राकडून बस डेपोसाठी १५ कोटी ३० लाख व डेपोच्या नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्यात साठी ३ कोटी मंजुरी दिली आहे. तसेच केंद्राकडून १०० बसेस महापालिकेला लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार आहे. महापालिका परिवहन ई-बससेवा लोकार्पणसाठी नागरिकांनीही गर्दी केली होती. मात्र पाहुणे अड्डीच तास उशिराने आल्याने, सर्वच जण भरउन्हात ताटकळत उभे होते.
परिवहन बस रस्त्यावर धावणार? महापालिकेने खाजगी ठेकेदाराद्वारे सुरू केलेली परिवहन बस सेवा गेल्या ७ वर्षांपूर्वी बंद पडली होती. अखेर महापालिकेने खरेदी केलेल्या एसी-नॉनएसी बसच्या लोकार्पणनंतर बस रस्त्यावर कधी धावणार आहे. असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तर काहींच्या मते फक्त १० बसेस महापालिकेकडे उपलब्ध असल्याने, बससाठी नागरिकांना अद्याप प्रतिक्षा करावी लागणार आहे.