डोंबिवली : पनवेल – वसई मार्ग हा उपनगरीय रेल्वे मार्ग म्हणून याआधीच घोषित करण्यात आला आहे, परंतु कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या डोंबिवली आणि दिवा स्थानकादरम्यान असणाऱ्या अप्पर कोपर रेल्वे स्थानकावरून दर दिवशी सुमारे २५,००० प्रवासी प्रवास करत असताना देखील दिवसातून केवळ ४ मेमु गाड्या सोडण्यात येतात. सकाळी ५:४५ मेमु गाडीनंतर थेट स. १०:१९ ची मेमु गाडी आहे, तसेच रात्रीची शेवटची गाडी ८:०० वा. ची आहे. यामुळे सकाळी येथील नागरिकांना आपल्या कामकाजाच्या ठिकाणी वेळेच्या साधारणपणे दोन तास आधी पोहोचावे लागत असल्याची माहिती खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या अप्पर कोपर स्थानक परिसरात विविध विकास कामे तसेच लोकसंख्या वाढत असल्यामुळे रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीमध्ये रेल्वे पकडताना नागरिकांच्या जीवाला हानी पोहोचू शकते. नागरिकांना या तोकड्या रेल्वे गाड्यांच्या संख्येमुळे होणारा त्रास आणि दैनंदीन प्रवासी संख्या वाढत असल्यामुळे या रेल्वे स्थानकावर वाढणारा ताण लक्षात घेता सदर पनवेल – वसई मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी तसेच उपनगरीय रेल्वे मार्ग म्हणून याआधीच घोषित या पनवेल – वसई मार्गावर मेमु ऐवजी उपनगरीय लोकल रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु करावी, अशी आग्रही मागणी आज खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी संसदेच्या अधिवेनादरम्यान शून्य प्रहर काळात केली.
पनवेल–वसई रेल्वे मार्गावर मेमु रेल्वेची संख्या वाढवा; डॉ. श्रीकांत शिंदे यांची संसदेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 4:43 PM