२०२१ मध्ये रजिस्टर मॅरेजच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:40 AM2021-07-29T04:40:09+5:302021-07-29T04:40:09+5:30
प्रज्ञा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा फटका विवाह सोहळ्यांना बसल्याने २०२० मध्ये ठरलेले अनेक विवाह सोहळे लांबणीवर ...
प्रज्ञा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचा फटका विवाह सोहळ्यांना बसल्याने २०२० मध्ये ठरलेले अनेक विवाह सोहळे लांबणीवर पडले. त्यामुळे मंगल कार्यालयांत विवाह करणारे कोरोनाच्या निर्बंधांमुळे रजिस्टर मॅरेजकडे वळू लागले. २०२१ मध्ये ही संख्या वाढली असून, ती २०१८-२०१९ च्या तुलनेत अधिक असल्याचे निरीक्षण विवाह नोंदणी कार्यालयाने नोंदविले.
दि. २२ मार्च २०२० ला लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे ठरलेले विवाह सोहळे वधू-वरांच्या कुटुंबीयांना पुढे ढकलावे लागले. अनलॉक १ सुरू झाल्यानंतर हळूहळू विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. परंतु, अवघ्या ५० जणांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात विवाह करण्यापेक्षा अनेकांनी रजिस्टर मॅरेजला पसंती दिली. काहीजण मात्र लग्ने ठरली असली तरी कोरोनाचे निर्बंध उठण्याची वाट पाहत आहेत. तर, काहीजणांनी नोकरीची गॅरंटी नसल्याने लांबणीवर टाकलेले विवाहसोहळे उरकून घेतले आहेत.
कोरोनाच्या आधी विवाह मंडळांच्या कार्यालयात किंवा घरी मुले, मुली किंवा त्यांची कुटुंबे मुला-मुलींच्या फाइल्स बघून लग्न ठरवीत असत. परंतु, कोरोनामुळे ऑफलाइन प्रवेश नसल्याने लग्नसोहळे ठरविण्यासाठी मुले-मुली घरी न येता ऑनलाइनच त्यांची लग्न ठरवीत आहेत, असे विवाह मंडळांनी सांगितले.
-----------------------
रजिस्टर मॅरेजची संख्या
जानेवारी ते डिसेंबर
२०१८ - ३,४८५
२०१९ - ३,६७७
२०२० - २,९६५
---------------------
जानेवारी ते जुलै (आतापर्यंत)
२०२१ - २,७००
---------------------
२०२० मध्ये कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे एप्रिलमध्ये एकही नोंदणी झालेली नाही.
---------------------------
लॉकडाऊनमुळे नोकरीची भीती असल्याने एक-दीड वर्ष लग्न पुढे ढकलत होतो; परंतु, आता खूप उशीर होत असल्याने अलीकडेच विवाह उरकून टाकला आहे.
- नीलेश लोगडे
---------------------------
माझ्या भावाचे लग्न ठरले आहे. आम्हाला मंगल कार्यालयात विवाह करायचा आहे; परंतु, कोरोनाचे निर्बंध असल्याने लग्न पुढे ढकलत आहोत. निर्बंध उठले की मंगल कार्यालयात विवाह करू.
- आकाश शिंदे, वराचा भाऊ
---------------------------
सन २०२० मध्ये रजिस्टर मॅरेजची संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊनचे निर्बंध; परंतु, २०२१ मध्ये रजिस्टर मॅरेजची संख्या वाढत आहे.
- अनिल यादव, विवाह नोंदणी अधिकारी
---------------