अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच ठिकठिकाणच्या आयुर्वेद वैद्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आधीच्या टप्प्यात तुळस लावण्याकडे गृहिणींचा ओढा होता. मात्र, आता काही महिन्यांपासून ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची मागणी वाढली असून ती झाडे घरोघरी लावण्याचा नवा ट्रेंड झाला असल्याचे नर्सरी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
कल्याण, डोंबिवली येथील नर्सरी व्यावसायिकाने याबाबत सांगितले की, तुळशीच्या रोपांना मागणी वाढेल, असे वाटले होते. कोविडच्या पहिल्या टप्प्यात काढा करून पिणे, वाफ घेणे तसेच गरम पाण्यात तुळस टाकून त्याद्वारे घसा शेकणे यासाठी दूध-हळदीप्रमाणे तुळशीची मागणी वाढेल, असे वाटले होते. पण, तसे झाले नाही. तसेच अश्वगंधा झाडाचीही मागणी वाढलेली नाही.ऑक्सिजनची जसजशी मागणी वाढू लागली. कोविड रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर झपाट्याने ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना मागणी असल्याचे दिसून आले. विशेषतः कल्याण येथील नर्सरी व्यावसायिकांनी याबाबतची माहिती दिली. आयुर्वेदिक शास्त्रीय कारण सांगत ऑक्सिजन देणारे झाड घरात लावण्यात येत आहेत. यामध्ये मध्यम आकारांच्या झाडांना, राेपांना पसंती देण्यात येत आहे.
या झाडांना मागणीपिस लिली, स्नेक प्लांट, मनी प्लांट, झमिया प्लांट, कडुनिंब, निलगिरी, ॲलोव्हेरा, रबर प्लांट, तुळशी, स्पायडर प्लांट, बांबूची राेपे, अरेका पाल्म यांना मागणी वाढली आहे.
तुळशीला फारशी मागणी वाढलेली नाही. कोविडच्या सुरुवातीच्या काळात तसे वाटले होते. पण ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना तुलनेने मागणी काही महिन्यांपासून जास्त वाढलेली आहे. घरात हे झाड लावायचे असल्याने मध्यम आकाराच्या स्वरूपात वाढलेले झाड, कुंड्या मागण्यात येत आहेत. - प्रसाद पाठारे, भागीदार, पाठारे नर्सरी, कल्याण
तुळशीला फारशी मागणी नाही. जे हातगाडी विक्रेते असतात ते नेहमीप्रमाणे तुळशीची रोप नेतात. पण विशेष म्हणून कोणी नागरिक येत नाहीत. आता तर लॉकडाऊन असल्याने नर्सरीच्या आत नागरिकांना येऊ दिले जात नाही. जे येतात त्यांना मागणीनुसार झाडं दिली जातात. त्यात सगळ्या प्रकारच्या झाडांचा समावेश असतो. - चौधरी नर्सरीवाले, चोळेगाव-ठाकुर्ली