पूरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या तरुणांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:56+5:302021-08-17T04:45:56+5:30
ठाणे : कोकणात आलेल्या महापुरामुळे कोकणवासीयांचे मोठे नुकसान झाले. या पुरात अडकलेल्या पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करून ती त्यांच्यापर्यंत पोहोचविणाऱ्या ...
ठाणे : कोकणात आलेल्या महापुरामुळे कोकणवासीयांचे मोठे नुकसान झाले. या पुरात अडकलेल्या पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करून ती त्यांच्यापर्यंत पोहोचविणाऱ्या मिशन कोकण २०२१ च्या टीमचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय व झेप प्रतिष्ठान यांच्यातर्फे गौरवपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात रविवारी सकाळी हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी ज्ञानसाधना ठाणे सोसायटीचे अध्यक्ष सतीश प्रधान, जनरल सेक्रेटरी कमलेश प्रधान, खजिनदार सतीश सेठ, विश्वस्त श्रीकांत देवळे, प्राचार्य डॉ. हेमंत चित्ते, झेप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे आदी उपस्थित होते. सुरुवातीला झेंडावंदन करून त्यानंतर एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे संचलन झाले, तर एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून कोरोनाच्या नियमांविषयी जनजागृती केली. त्यानंतर कमलेश प्रधान यांनी पूरग्रस्तांसाठी काम केलेल्या सर्व टीमचे अभिनंदन केले, तर धनवडे यांनी झेप प्रतिष्ठानची माहिती देत पूरग्रस्त भागात आलेले अनुभव कथन केले. यावेळी ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्रमुख मानसी प्रधान व कमलेश प्रधान, मिशन कोकण टीमच्या प्रमुख प्रज्ञा म्हात्रे, झेप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे, आम्ही शिवभक्त परिवाराचे दीपेश दळवी, सेजल रांगळे, अजय भोसले यांच्यासह टीमचे सदस्य आणि एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांना गौरवपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन पाठारे याने केले.