डोंबिवली - मध्य रेल्वेच्या बदलापूर ते कर्जत मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. इंद्रायणी एक्सप्रेस वांगणी स्थानकादरम्यान ब्रेकफेलमुळे थांबली होती. त्यामुळे अनिश्चित काळासाठी लेट होणार असल्याची सूचना प्रवाशांना देण्यात आली. दरम्यान, इंद्रायणी एक्स्प्रेस पुण्याकडे रवाना झाली असून एक्स्प्रेस कर्जतपर्यंत पोहचल्याची माहिती मिळते आहे. दररोज सकाळी सव्वा नऊ वाजता पुण्याला पोहचणारी इंद्रायणी एक्स्प्रेस शुक्रवारच्या अपघातामुळे तिच्या नियोजित वेळेच्या सुमारे अडीच तास विलंबाने धावत आहे.
या बिघाडामुळे बदलापूर ते कर्जत डाऊन लाईन बंद झाली असल्याने त्या मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्जतहून सकाळी 7.54 ला सुटणारी लोकल व 8.15 च्या सुमारास सुटणारी लोकल न आल्याने कर्ज स्थानकात गर्दी झाली आहे. ईदनिमीत्त शासकीय ऑफिसना सुटी असली तरी निमशासकीय, खासगी कंपन्यांना सुटी नाही, त्या चाकरमान्याचे हाल झालेत.
इंद्रायणी एक्सप्रेसखाली वांगणी दरम्यान म्हैस सापडल्याने इंजिनामध्ये बिघाड झाला. इंजिनाच्या पुढील बाजूच्या बम्परचे मोठे नुकसान झाले. मोठा अपघात टळला, गॅस कटरच्या सहाय्याने वेगात काम सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.