भिवंडी : पालिकेच्या आरोग्य विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार प्रकरणात अडकलेल्या महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांच्या विरोधातील तक्रारीची दखल घेऊन शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चौकशीसाठी ठाणे परिमंडळाचे आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. पालिका आयुक्तांनी सोमवारी डॉ. शेट्टी यांची तडकाफडकी उचलबांगडी केली.मागील आर्थिक वर्षासाठी शासनाकडून आलेल्या औषधांची माहिती व केलेल्या वितरणामध्ये अनियमीतता असल्याबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांच्याविरूद्ध महापौर जावेद दळवी यांनी शासनाकडे नोव्हेंबर २०१८ मध्ये तक्रार केली होती. शासनाकडून प्राप्त औषध पुरवठा व नागरी आरोग्य अभियानाच्या कामकाजाबाबतचे मुद्दे महापौरांनी तक्रारीत नमुद केले आहेत.शासनाच्या आरोग्य प्रशासनाला तब्बल सहा महिन्यानंतर या घटनेचे गांभिर्य समजले. त्याची दखल घेत राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या सहसंचालक डॉ. दिप्ती पाटील यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली मे २०१९ मध्ये त्रिसदस्य समिती गठीत केली आहे. या समितीत सहा. संचालक (कुष्ठरोग), आरोग्य सेवा, ठाणे परिमंडळ व मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपसंचालक, आरोग्य सेवा, ठाणे यांचा समावेश करण्यात आला असून, तशी माहिती शासनाच्या आरोग्य विभागाने भिवंडी महानगरपापालिका आयुक्तांना पत्राव्दारे दिली आहे.डॉ. जयवंत धुळेंकडे प्रभारडॉ. विद्या शेट्टी या दीड महिन्यापासून रजेवर होत्या. त्या हजर झाल्यानंतर आरोग्य विभागाचे पत्र आयुक्तांना मिळाले. त्यानुसार आयुक्त मनोहर हिरे यांनी डॉ. शेट्टी यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी डॉ. जयवंत धुळे यांची नेमणूक केली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी, समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:26 AM