उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील सुख-सुविधेचा आढावा माजी आमदार पप्पू कलानी यांनी घेऊन रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी चर्चा करून रुग्णालयाचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयाच्या प्रत्येक कक्षात जाऊन रुग्णाची चौकशी केली.
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांची न्यायालयाने पेरॉलवर सुटका केल्यानंतर कलानी राजकारण व समाजकारणात सक्रिय झाले. शुक्रवारी दुपारी पप्पू कलानी यांनी नगरसेवक मनोज लासी, ओमी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांच्यासमवेत मध्यवर्ती रुग्णालय गाठले. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी मोहन मोनालकर, जावेद दळवी यांच्यासोबत चर्चा करून रुग्णाच्या सुविधांबाबत माहिती करून घेतली. तसेच प्रत्येक रुग्ण कक्षात जाऊन लहान-मोठ्या रुग्णाच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. दरम्यान, गणेशोत्सवादरम्यान विविध पक्ष नेत्याच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. तसेच सार्वजनिक गणेश मंडळाला भेटी देऊन त्यांचा उत्साह वाढविला. यामुळे पप्पू कलानी यांची चर्चा होऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांचे धाबे दणाणले. महापालिका निवडणुकीचे वारे शहरात वाहत असून, त्या दृष्टीने कलानी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची बांधणी करीत असल्याचेही बोलले जाते. एकूणच शहरात कलानीमय वातावरण झाल्याचे चित्र शहरात आहे.