अंतरिम आदेशांना पुढील तारखेपर्यंत ठाणे न्यायालयाची स्थगिती
By जितेंद्र कालेकर | Published: June 10, 2020 11:50 PM2020-06-10T23:50:12+5:302020-06-10T23:54:38+5:30
एकीकडे कोरोनामुळे ठाण्यातील जिल्हा न्यायालयातील कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात झाली झाली आहे. परंतू, वकील आणि पक्षकारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विविध खटल्यांमधील अंतरिम आदेशांना पुढील तारखेपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे वकील आणि पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हयातील विविध प्रकरणांमधील अंतरिम आदेशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील तारखेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश ठाण्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी दिले आहेत. त्यामुळे जामीन, बँकेची वसूली तसेच विविध बांधकामांच्या संबंधित शेकडो पक्षकार आणि वकीलांना दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज हे ८ जून पासून सकाळी १०.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशा दोन सत्रांमध्ये सुरु झाले आहे. असे असले तरी कंटेनमेंट झोनमधील वकीलांना न्यायालयात येण्यास परवानगी नाही. कामकाज नेहमीप्रमाणे सुरु असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कामकाज सुुरु ठेवण्याला एकीकडे वकील संघटनांचा विरोध आहे. पूर्वीप्रमाणेच केवळ तातडीची आणि गंभीर स्वरुपाच्या प्रकरणांची सुनावणी एका सत्रामध्ये केली जावी, अशी मागणी वकील संघटनांनी प्रधान न्यायाधीशांकडे केली होती. यासह वकीलांना बसण्यासाठी बार रुम खुला करण्यात यावा, अशा काही प्रमुख मागण्या वकीलांनी केल्या होत्या. मात्र, दोन सत्रांमध्ये हे कामकाज सुरु करण्यात आले असून यापुढे सर्व प्रकारचे स्थगिती आदेश हे पुढील तारखेपर्यंत कायम करण्याचे (वाढविण्याचे) आदेश जिल्हा प्रधान न्यायाधीश जोशी यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे वादग्रस्त बांधकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अनधिकृत बांधकामांवरील होणारी कारवाई तसेच वेगवेगळया खटल्यांमधील जामीनांवरील सुनावणी, बँकेमार्फत होणारी वसूली आदी विविध प्रकरणांमधील ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, वाडा, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड आणि नवी मुंबई आदी ठिकाणच्या अनेक पक्षकारांसह वकीलांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारपासून जरी न्यायालयाचे कामकाज हे नियमित सुरु झाले असले तरी ८ आणि ९ जून रोजी न्यायालयात अवघ्या १०० ते १५० वकीलांची उपस्थिती होती. मात्र, वकीलांच्या अनुपस्थितीअभावी कोणत्याही प्रकरणांमध्ये एकतर्फी आदेश देण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ ठाणे न्यायालयाचे कामकाज हे नियमित दोन सत्रांमध्ये सुरु झाले आहे. ते पूर्वीप्रमाणेच एका सत्रात तीन तासांसाठी तसेच तातडीच्या आणि गंभीर प्रकरणांसाठी सुरु असावे. वकीलांना बसण्यासाठी बाररुम खुला करावा, अशी मागणी होती. मात्र हा बार रुम पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे.’’
प्रशांत कदम, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन, ठाणे.