प्रशांत माने -
डोंबिवली (ठाणे): गेले नऊ महिने सामूहिक बलात्काराच्या यातना भोगणाऱ्या अल्पवयीन पीडितेच्या मानलेल्या भावाने तिची ओळख आपल्या मित्राशी करून दिली. त्याने अन्य एका तरुणाशी तिची करून दिलेली ओळख तिला लैंगिक अत्याचारांच्या मालिकेच्या विळख्यात जखडून टाकणारी ठरली. त्या नराधमाने स्वत: तर तिचे लचके तोडलेच; पण त्याच्या अन्य मित्रांना लचके तोडण्याकरिता स्वाधीन केले. तिच्यावर झालेल्या बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत किंवा ठार मारण्याची धमकी देत नराधमांनी तब्बल आठ ठिकाणी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
जेमतेम १५ वर्षांची पीडित मुलगी नववीत शिकते. एका मुलाचे तिच्या घरी येणे-जाणे असायचे. ती त्याला भाऊ मानायची. त्याने तिची ओळख अन्य एकाशी करून दिली. संबंधिताने तिचा परिचय बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीशी करून दिला. तेव्हापासून तिच्यावर बलात्काराची मालिका सुरू झाली. मुख्य आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावले. तिला रिक्षात बसवून मुख्य आरोपी त्याच्या अन्य एका मित्राच्या घरी घेऊन गेला. बेडरूममध्ये तिला अश्लील फोटो दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडीओही मित्रांनी काढला. हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुख्य आरोपी व त्याच्या मित्रांनी ठिकठिकाणी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. तब्बल आठ ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. यावेळी कधी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तर कधी दारू, हुक्का, गुंगीचे औषध जबरदस्तीने पाजून तिच्यावर अत्याचार केला गेला. याचा तिच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होऊन ती आजारी पडली होती. मे महिन्यात तिला रुग्णालयात दाखल केले होते; परंतु अत्याचार थांबत नव्हते.
पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा पीडित मुलीचा जानेवारी २०२१ पासून लैंगिक छळ सुरू होता. तक्रार दाखल होण्याआधी बुधवारी दुपारीदेखील तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने कळवा येथील सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. आता तिची प्रकृती सुधारत आहे.
प्लास्टिक पिशवीचा करीत होते वापरआरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करताना गर्भधारणा टाळण्यासाठी निरोधऐवजी प्लास्टिक पिशवीचा वापर केला, अशी माहिती तक्रारीत नमूद केलेली आहे.
बेपत्ता झाल्याची तक्रारमे महिन्यात एका ठिकाणी तिला रात्रभर डांबून ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी तिला सोडण्यात आले. पीडितेच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात तिची मिसिंग तक्रार दाखल केली होती. तेव्हा आपले बिंग फुटेल, अशी भीती वाटल्याने मुख्य आरोपी व त्याच्या मित्राने तिला ठार मारण्याची धमकी दिली होती.