गणेशोत्सवापर्यंत मूर्तिकारांना अत्यावश्यक सेवेत सामावून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:31+5:302021-05-05T05:06:31+5:30
ठाणे : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असल्याकारणाने मूर्तिकारांना कच्चा माल मिळविण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव होईपर्यंत मूर्तिकारांना अत्यावश्यक सेवेत ...
ठाणे : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असल्याकारणाने मूर्तिकारांना कच्चा माल मिळविण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव होईपर्यंत मूर्तिकारांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेऊन विशेष पास देऊन त्यांना प्रवास करण्यास मुभा द्यावी, अशी एकमुखी मागणी ठाणे जिल्ह्यातील मूर्तिकारांनी केली. रविवारी झालेल्या बैठकीत ठाणे गणेशोत्सव समन्वय समितीअंतर्गत ठाणे गणेश मूर्तिकार संघाची स्थापना करण्यात आली.
ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती अंतर्गत ठाणे गणेश मूर्तिकार संघाची सुरुवात केली आहे. गणेशोत्सव मंडळे व मूर्तिकारांमध्ये योग्य समन्वय साधून त्यांच्या समस्यांचे निराकारण व्हावे हा हेतू यामागे आहे. त्याची पहिली पायरी म्हणून रविवारी मूर्तिकारांची बैठक घेण्यात आली. यात काही महत्त्वाचे मुद्दे मूर्तिकारांसह समितीने मांडले असल्याचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले. मूर्तिकारांना सवलतीच्या दरात महापालिकेच्या मोकळ्या जागा उपलब्ध करून द्याव्यात, गणेश मूर्तीची उंची व शाडूची की मातीची मूर्ती या सर्वांचा संभ्रम दूर करावा, गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्णय स्थगित करावा, शाडूच्या मातीच्या मूर्ती या खर्चिक व तडा जाण्याची समस्या असल्या कारणाने पीओपी मूर्तीला देखील परवानगी द्यावी अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. प्रशासनाने लवकरच या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन आपले निर्णय जाहीर करावे. जेणेकरून मागील वर्षी सारखी परिस्थिती उद्भवणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली, या बैठकीत विशाल सिंग, किरण गाठी, प्रशांत शेवाळे, श्रीकांत परब हे पदाधिकारी व मूर्तिकार संघातून अभिजीत नलावडे, आशिष हाटे असे अनेक ठाणे, भिवंडी व कल्याण मधील प्रसिद्ध मूर्तिकार उपस्थित होते.