ठाणे/मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरसह मुमताज इजाज शेख आणि इसरार अली जमील सय्यद यांची मंगळवारी हवाला रॅकेट, अवैध संपत्तीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली. त्यातून या तिघांवर ‘मनी लाँड्रिंग’चा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून, कुख्यात दाऊद इब्राहिमचेही हवाला रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ठाणे पोलिसांनी इक्बालच्या मोबाइल फोन कॉल्सचा वर्षभराचा तपशील (सीडीआर) तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यातून कोणते राजकीय नेते, बिल्डर व व्यावसायिक कासकरच्या संपर्कात होते याची गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.ठाणे पोलिसांनी खंडणीच्या दोन गुन्ह्यांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह मुमताज इजाज शेख आणि इसरार अली जमील सय्यद यांना मागील सोमवारी मुंबईतून अटक केली होती. आता ‘ईडी’नेही कासकर व या दोघांवरील फास आवळला आहे. इक्बाल, इसरार सय्यद, मुमताज शेख व त्यांच्या सहकाºयांनी खंडणीतून मिळविलेला पैसा अन्य उद्योगांत भागीदारीमध्ये गुंतविल्याची शक्यता आहे. त्यामुळे या तिघांबरोबरच संबंधित उद्योजक, व्यापाºयांकडे ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.इक्बालच्या आठ दिवसांच्या चौकशीत दाऊदशी असलेल्या संबंधांपासून खंडणी वसुलीच्या कार्यपद्धतीची माहिती त्याने ठाणे पोलिसांना दिली. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात इक्बालचे जाळे पसरले असल्याचे चौकशीतून समोर आले. पोलिसांनी आरोपी मुमताज आणि इसरार यांच्या बँक खात्यांचा तपशीलही संबंधित बँकांकडून मागविला आहे.झाकीर नाईकला दाऊदचा अर्थपुरवठा?वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ला दाऊद इब्राहिमने अर्थपुरवठा केल्याची माहिती इक्बाल कासकरने पोलिसांना दिल्याची चर्चा आहे. मात्र इक्बालच्या चौकशीमध्ये झाकीर नाईकशी संबंधित एकही प्रश्न विचारण्यात आला नाही किंवा त्याने स्वत:हून अशा प्रकारची कोणतीही माहिती दिली नसल्याचे ठाण्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.आज न्यायालयात हजेरी : इक्बालच्या पोलीस कोठडीची आठ दिवसांची मुदत बुधवारी संपणार आहे. बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर इक्बालची पोलीस कोठडी दुस-या गुन्ह्यामध्ये मागितली जाईल.
इक्बाल कासकरची ‘ईडी’कडून चौकशी सुरू, झाकीर नाईकला दाऊदचा अर्थपुरवठा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 5:53 AM