भिवंडीत इराणच्या कांद्याची साठवणूक; कांदा सडल्याने स्थानिक नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 09:28 PM2020-03-09T21:28:28+5:302020-03-09T21:28:57+5:30
जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातला असून विदेशातील अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिमाण झाला आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी- जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातला असून विदेशातील अनेक वस्तूंच्या आयात निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिमाण झाला आहे. विशेष म्हणजे भिवंडीतील पूर्णा ग्राम पंचायत हद्दीत विदेशातून आणलेले जुने मास्क धुवून पुन्हा या मास्कची विक्री करण्याची खळबळजनक घटना शनिवारी समोर आली असतांनाच आता इराण येथून कांदा भिवंडीत दाखल झाला आहे. खोणी ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या मीठपाडा परिसरातील आसरा हॉटेलच्या मागे असलेल्या एका बंद यंत्रमाग कारखान्यात हा कांदा साठवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या सडक्या कांद्याचा आकार मोठा असून या कांद्याला आता कोंब देखील फुटले आहेत. तर कांदा सडत चालल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिक या वासाने हैराण झाले आहेत. हा कांदा सात ते आठ दिवसांपूर्वी पासून येथे साठवण्यात आला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
सोमवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने आरपीआय सेक्युलरचे मीठपाडा शाखा अध्यक्ष आकाश साळुंके यांना हा प्रकार समजल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व हा प्रकार साळुंके यांनी जाणून घेतल्याने हा कांदा इराण येथुन आला असल्याची माहिती त्यांना या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली. त्याचबरोबर हा कांदा परेश मेहता या व्यापाऱ्याचा असून त्याने मिठापाडा येथील पवन शेठ या कारखाना मालकाच्या कारखान्यात सध्या हा कांदा साठवून ठेवला असून सुमारे 80 टण कांदा असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापक रियाज अली याने दिली असून घटनास्थळी निजामपुरा पोलीस दाखल झाले असून पोलीस प्रशासनाने कृषी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असून कृषी अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती देखील निजामपुरा पोलोसांनी दिली आहे.