ठाणे : घोडबंदर रोड येथील वसुधा देविदास बोरकर (४२) यांचे तीनहातनाका येथे कारमधून उतरतांना प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले एक लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने गहाळ झाले होते. ते नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी अवघ्या दोन तासांमध्ये शोधून परत मिळवून दिल्याबद्दल बोरकर यांनी त्यांचे आभार मानले.
हिरानंदानी इस्टेट येथे राहणाऱ्या वसुधा या पतीसोबत त्यांच्या कारने घोडबंदर ते ठाण्यातील तीनहातनाका येथे ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आल्या होत्या. त्या गाडीतून उतरत असताना सुमारे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेली प्लास्टिकची पिशवी त्यांच्याकडून गहाळ झाली. सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी आणि सोन्याची माळ असे दागिने त्यामध्ये होते. ती त्यांनी मांडीवर ठेवलेली होती. तीनहातनाका येथे ती गहाळ झाली. आपली दागिन्यांची पिशवी प्रवासात कुठेतरी गहाळ झाल्याचे नवी मुंबईतील महापे येथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. तिथून परत त्या सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तातडीने त्यांनी घटनास्थळी पुन्हा शोध घेतला. परंतु, ती पिशवी न मिळाल्याने त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दागिने गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली. याची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी त्या भागात पेट्रोलिंग करणाºया नौपाडा बीट मार्शल एकचे पोलीस नाईक कल्पेश कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल भूपेश भामरे यांना या दागिन्यांच्या पिशवीची माहिती दिली. कदम आणि भामरे यांनी तीनहातनाका परिसरातील फुगे विक्रेत्यांना विश्वासात घेऊन याची चौकशी केली. तेंव्हा एका फुगे विक्रेत्याने अशी पिशवी मिळाल्याचे प्रांजळपणे सांगितले. त्याच्याकडील पिशवीतील सुमारे ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची ओळख पटवून ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांगले यांनी वसुधा यांना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सुखरुप परत केली. हे दागिने मिळवून दिल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले. कदम आणि भामरे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे मांगले यांनी कौतुक करून त्यांना वरिष्ठांमार्फत बक्षिस देण्यासाठी शिफारस करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.