मीरारोड - महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी असताना शिवसेनेतील पद नियुक्त्यांवरून सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकलेले आमदार प्रताप सरनाईक व मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंघटक यांच्यातील मतभेद सरनाईक यांच्या व्हायरल पत्रप्रपंचमुळे चव्हाट्यावर आले आहेत. पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलेली पदे सरनाईक यांनी संपर्कप्रमुख नात्याने रद्दबातल ठरवली आहेत. तर जिल्हाप्रमुख व जिल्हासंघटक यांनी संदेश जारी करत शिंदेंच्या आदेशाचा उल्लेख करून त्या नियुक्त्या ग्राह्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीचे नाईक आत्महत्या प्रकरण लावून धरत अभिनेत्री कंगना राणावतच्या आरोपांना प्रत्युत्तर देणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व कुटुंबियांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्या पासून आ. सरनाईक हे अडचणीत आले आहेत. सध्या सर्वसामान्य शिवसैनिक, नागरिक तर सोडाच सेनेचे पदाधिकारी, पत्रकारांना पण त्यांच्याशी थेट संपर्क साधता येत नाही. आमदार प्रताप सरनाईक व त्यांचे कुटुंबीयांची थेट शिवसेनापक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक मानली जाते. तर सेनेतील महत्वाचे नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यातील कळगीसुद्धा सतत चर्चेत असतो.
सरनाईक हे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले असून मीरा भाईंदर शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. परंतु महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली पण आ. सरनाईकांना मात्र शिवसेनेला सत्तेच्या जवळदेखील नेता आले नाही. महापालिका व संघटनेत सरनाईक यांनी स्वतःचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करणे स्वाभाविक असले तरी यातूनच गटबाजी सुद्धा वाढत चालली आहे. ईडीच्या फेऱ्यात सरनाईक अडकले असतानाच दुसरीकडे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे व जिल्हासंघटक स्नेहल सावंत यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनेकांना शिवसेनेची पदं नियुक्तीची पत्रं वाटप केली आहेत.
विद्या कदम, जयलक्ष्मी सावंत, प्राची पाटील यांची महिला उपजिल्हा संघटक पदी नियुक्ती केली गेली आहे. तसेच उपशहर संघटक, विभाग प्रमुख आदी अन्य पदे सुद्धा देण्यात आली आहेत. या पदांच्या नियुक्तीवरून सरनाईक व त्यांचे समर्थक नाराज आहेत. सरनाईक यांनी तर म्हात्रे व सावंत याना पत्र लिहून त्याच्या प्रति पक्षनेत्यांना पाठवल्या आहेत. त्या पत्रांच्या पोच केलेल्या प्रति ह्या सध्या समाज माध्यमातून व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेत असलेले अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
त्या पत्रात सरनाईक यांनी म्हटले आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अन्य वरिष्ठ नेत्यांना न कळवता स्वतःच्या लेटरहेडाचा बेकायदेशीर वापर करून परस्पर नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे पक्षात वादविवाद सुरू झाले आहेत. त्याची तक्रार मी वरिष्ठांना केली असून त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. सामनात प्रसिद्ध झालेल्या पदां व्यतिरिक्त सर्व बेकायदेशीर नियुक्त्या आहेत. अश्या नियुक्त्या पक्ष शिस्तीत न बसणाऱ्या बेकायदेशीर असल्याने संपर्क प्रमुख म्हणून त्या नियुक्त्या रद्द करत आहे असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे पालिकेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न साकार करायचे असून शिवसेनेत वादविवाद व मतभेद होणार नाहीत याची काळजी जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख म्हणून आपण घ्यायची आहे अशी तंबी देखील म्हात्रे व सावंत यांना दिली आहे. स्नेहल सावंत यांना लिहलेल्या पत्रात एक मुद्दा वेगळा आहे. त्यात काही पदांची यादी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली होती. ती अजून मंजूर झाली नाही व सामनात आली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे व आपण अत्यंत तातडीची होती म्हणून तात्पुरती पदे वर्षभरा साठी दिली होती असे सरनाईक यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सरनाईकांनी दिलेले ती तात्पुरती पदे देखील बेकायदेशीर नाही का? मुळात शिवसेनेत पद रद्द करण्याचा अधिकार संपर्कप्रमुखांना आहे का? असा सवाल काही शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
सरनाईक यांच्या लेटरबॉम्बवर म्हात्रे व सावंत यांच्या नावाने शिवसेना जिल्हाशाखेचा संदेश व्हायरल झाला आहे. त्यात जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संघटक यांनी केलेल्या पद नियुक्त्या ह्या ग्राह्य असून पक्षवाढीसाठी तसे अधिकार आहेत असा मंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शिवसेनेमधील पद नियुक्त्यांचा वाद शिंदे विरुद्ध सरनाईक असा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान प्रताप सरनाईक यांनी मात्र , सामनात प्रसिद्ध झालेल्या तसेच वरिष्ठांच्या परवानगी शिवाय म्हणजेच उद्धवजी, सचिव अनिल देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे व संपर्कप्रमुख म्हणून मी या पैकी कोणाच्याही परवानगी शिवाय झालेल्या नियुक्त्याच रद्द ठरवल्या आहेत. त्यांच्या परवानगीने झालेल्या नियुक्त्या सोडून स्थानिक पातळीवर काही नियुक्त्या परस्पर झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. केवळ त्याच रद्द केल्या आहेत असे सांगितले.