----------------
कोरोनाचे ६१ रुग्ण
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी नव्या ६१ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर, ३३ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या ६८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीत एक लाख ३८ हजार ४७७ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
--------------------------------
घरफोडीत दागिने लंपास
डोंबिवली : खोणी गाव परिसरात राहणारे संतोष फराड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील २३ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------
२७ हजारांची रोकड चोरली
डोंबिवली : रमेश बिष्णोई हे घरगुती गॅसच्या डिलिव्हरी करीत असताना त्यांच्याकडे २२ ते २३ वयोगटांतील एक तरुण आला. त्याने त्यांना आम्ही ऑनलाइन गॅसचे बुकिंग केले आहे; पण माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत, असे सांगितले. बिष्णोई यांनी सुट्टे पैसे देण्याची तयारी दर्शविल्यावर तरुणाने त्याच्याकडील काही नोटा त्यांच्याकडे दिल्या आणि बोलण्यात गुंतवून हातचलाखीने बिष्णोई यांच्याकडील २७ हजारांची रोकड घेऊन पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिष्णोई यांनी टिळकनगर पोलिसांत तक्रार दिली. ही घटना बुधवारी पूर्वेतील शिवाजी उद्योगनगर येथे घडली.
-------------
दुचाकीस्वार जखमी
कल्याण : दिलीप पवार हे दुचाकीचालक रिक्षाच्या धडकेत जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री एक वाजता मुरबाड रोडवर घडली. रिक्षाचालक पसार झाला असून, त्याच्या रिक्षाच्या मिळालेल्या क्रमांकावरून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------
दुचाकी चोरी
कल्याण : मयूर वारुळे यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या नांदिवली परिसरातील लोटस बिल्डिंग येथे उभी केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना रविवारी रात्री १०च्या सुमारास घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------