मीरा रोड : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तैनात केलेल्या भरारी पथकाने काशिमीरा येथून साडेअकरा लाखाची रक्कम व सिगारेटने भरलेले खोके जप्त केले आहे. हा मुद्देमाल काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मद्य, शस्त्रांची बेकायदा वाहतूक, मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी पैसे, भेटवस्तूंंचे वाटप आढळल्यास त्यावर कारवाईसाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. काशिमीराच्या नीलकमल नाक्यावर कनिष्ठ अभियंते विक्रम तरपे, पोलीस उपनिरीक्षक अनिल रावण, पोलीस श्पिाई मदगे, पवार आदींनी शनिवारी संशयावरून टेम्पो अडवून चालक सतीश ठाकूर (३५ ) याच्याकडे चौकशी केली. टेम्पोत मागे बसलेल्या सलीम पिरानी (६२ )याच्याकडे ११ लाख ४६ हजाराची रक्कम सापडली. तसेच टेम्पोत सिगारेटने भरलेले मोठे खोके सापडले. पथकाने या बाबत पथकप्रमुख अविनाश जाधव यांना माहिती दिली. जाधव व पथकाने टेम्पो, रोख व मुद्देमाल रात्री काशिमीरा पोलिसांच्या स्वाधीन केला. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याची नोंद केली असून चौकशी सुरू केली आहे. सापडलेली रक्कम नेमकी कशाची आहे याचा तपास सुरू आहे. रक्कम मोठी असल्याने आयकर विभागालाही आम्ही कळवणार आहोत असे पोलीस निरीक्षक धनाजी कलंत्रे म्हणाले.
काशिमि-यात साडेअकरा लाख जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:28 AM