सदानंद नाईक उल्हासनगर : शहरावर गेली दोन दशके पेक्षा जास्त कालावधीत सत्ता गाजविणाऱ्या कलानी कुटुंबाचे राजकीय अस्तित्व पणाला लागल्याचे चित्र स्थायी समिती सदस्य निवडणुकी निमित्त निर्माण झाले. भाजपने ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांना समिती सदस्य पदासाठी नाव न सुचविल्यास, शिवसेना सुचवेल का? अश्या चर्चेलाही उधाण आले आहे.
उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी असे सूत्र शहरात गेली दोन दशका पेक्षा जास्त कालावधी साठी निर्माण झाले होते. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर कलानी साम्राज्याला भाजप - शिवसेना युतीने सुरुंग लावून महापालिकेवर सत्ता आणली. पप्पू कलानी २० वर्ष तर ज्योती कलानी ५ वर्ष आमदार राहिल्या आहेत. तसेच ज्योती कलानी व सूनबाई पंचम कलानी महापौर पदी राहिल्या असून सलग ७ वेळा स्थायी समिती सभापती पदी राहण्याचा मान ज्योती कलानी यांच्याकडे जातो. पप्पू कलानी व ज्योती कलानी हे नगराध्यक्ष पदी राहिल्या आहेत. मात्र गेल्या महापालिका निवडणूक पासून शहरातील राजकारण पूर्णतः बदलले आहे. भाजपने महापौरांच्या आशेने शिवसेना सोबतची युती तोडून ओमी कलानी टीम सोबत आघाडी केली.
भाजपाने ओमी टीमच्या समर्थकांना भाजप चिन्हावर निवडणूक लढविण्यास भाग पाडले. मात्र त्यांना पूर्ण बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी स्थानिक साई पक्षा सोबत महाआघाडी करून सत्ता मिळविली. त्यानंतर ओमी टीम समर्थक नगरसेवकांना जाणीवपुर्वक बाजूला ठेवले. तसेच मीना आयलाणी यांची सव्वा वर्षाची महापौर पदाची टर्म संपूनही पंचम कलानी यांना महापौर पद दिले नाही. ओमी कलानी यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यावर पंचम कलानी यांना महापौर पद दिले. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचे सांगून शेवटच्या वेळी उमेदवारी ज्योती कलानी ऐवजी कुमार आयलाणी यांना दिली. अखेर ज्योती कलानी यांनी यु-र्टन घेत राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली. अवघा १८०० मताने त्यांचा पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीतील वचपा काढण्यासाठी ओमी कलानी समर्थक १० नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत शिवसेना उमेदवार लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले. तेव्हां पासून भाजपतील ओमी समर्थक नगरसेवक शिवसेना सोबत आहेत. दरम्यान साई पक्षाचे १० नगरसेवक भाजप मध्ये विलय झाल्याने, भाजपा नगरसेवकाची एकून संख्या ४१ झाली. एकून नगरसेवकांच्या संख्यांच्या आधारावर स्थायी व विशेष समिती मध्ये भाजपचे बहुमत राहणार आहे. १६ पैकी भाजपचे ९, शिवसेना ५, रिपाइं व राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक सदस्य राहणार आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत ओमी टीम समर्थक नगरसेवकांनी बंडोखरी केल्याने, स्थायी समिती सदस्य पद देण्याला भाजपने विरोध केला. कलानी समर्थक नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य पद द्या. अशी मागण्याची वेळ कलानी समर्थक नगरसेवकांवर आली. एकूणच कलानी कुटुंबाचे राजकीय कोंडी झाल्याचे चित्र शहरात निर्माण झाले.
चौकट
स्थायी समिती सदस्य फोडाफोडीचे राजकारण
महापालिकेची विशेष महासभा मंगळवारी दुपारी होत असून समितीच्या ८ सदस्याची निवड होणार आहे. १६ पैकी ९ सदस्य भाजपचे राहणारा असून स्थायी समिती सभापती पद भाजपकडे राहणार आहे. शिवसेना व त्याच्या मित्र पक्षाचा सभापती होण्यासाठी फडाफोडीचे राजकारण ओमी कलानी टीम व शिवसेनेला करावे लागणार आहे.