ठाणे - बाबुभाई पेट्रोल पंप ते कॅसल मिल (मीनाताई ठाकरे चौक)दरम्यान उभारलेल्या उड्डाणपुलावरून अखेर दुतर्फा वाहतुकीला सुरुवात झाली आहे. ती सुरू करण्यावरूनही शिवेसना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. हा उड्डाणपूल आमच्यामुळेच खुला झाला, असा दावा दोहोंनी केला आहे. दीड वर्षांवर आलेल्या निवडणुकींच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये लुटुपुटुची श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.शहरातील एकाही कामाचे श्रेय भाजपला मिळू नये, यासाठीची रणनीतीच शिवसेनेने आखली आहे. त्यात सध्या तरी काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला. याचे श्रेय भाजपला मिळू नये, यासाठी शिवेसनेने आधीच बॅनरबाजी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळेस भाजपनेही हे श्रेय आपलेच असल्याचे सांगून शिवसेनेने हा प्रस्ताव रोखून ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, ठणे शहराला पाण्याचा प्रश्न सतावत होता. वाढीव १० एमएलडी पाणी मिळावे, म्हणून प्रयत्न सुरू होते. भाजपच्या नगरसेवकाने यासाठी पत्रव्यवहारही केला होता, परंतु महापौर नरेश म्हस्के यांनी याबाबत बैठक घेऊन स्टेमच्या अधिकाऱ्यांना खडसावून १० एमएलडी पाणी वाढवून देण्याचे आश्वासन मिळविले. यावरूनही महापौर विरुद्ध भाजप नगरसेवक यांच्यातील श्रेयासाठीची चढाओढ ठाणेकरांनी पाहिली. पूल सुरू होताच श्रेय आता बाबुभाई पेट्रोल पंप ते कॅसल मिल (मीनाताई ठाकरे चौक)दरम्यान उभारलेल्या उड्डाणपुलावरून वाहतुकीत सुरुवात केली आहे. यावरून शिवसेनेने प्रसिद्धीपत्रक काढून आधीच श्रेय घेऊन टाकले, परंतु मंगळवारी सायंकाळी उशिरा भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून हे आमच्यामुळेच झाले असल्याचा दावा केल. एकूणच भाजप आणि शिवसेनेते श्रेयवादावरून जो काही सामना रंगू लागला आहे.
विकासकामांवरून सेना-भाजपमध्ये कलगीतुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 3:15 AM