ठाणे : ‘इसिस’ला सहकार्य केल्याचा तसेच पाच हजार ५०० बंदुका आणि पाच लाख काडतुसांची वाहतूक करताना ग्रीस पोलिसांनी अडीच वर्षांपूर्वी अटक केलेला ठाण्यातील भारतीय खलाशी कल्पेश शिंदे (२४) हा तरुण आता मायदेशी परतला आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीने ग्रीसच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.दहशतवाद्यांना काडतुसे पुरवत असल्याचा आरोप असलेला कल्पेश हा २९ महिने ग्रीसच्या तुरुंगात होता. प्रशिक्षणार्थी खलाशी म्हणून तो २०१५ मध्ये लीगल पोर्टवर रुजू झाला होता. तुर्कीवरून लिबियाला जाणाºया जहाजावर ड्युटी असताना ग्रीसचा समुद्र पार करताना त्यांच्या जहाजाची स्थानिक पोलिसांनी तपासणी केली. कंटेनरच्या झडतीत या बंदुका आणि काडतुसे आढळली. त्यामुळे ग्रीसच्या नौदलाने एकूण आठ जणांना पकडले. कंटेनरमधील मालाशी आपला संबंध नसल्याचेही त्याने ग्रीस पोलीस आणि नौदलाला सांगितले. परंतु, पोलिसांनी अटक करून कोठडीत ठेवले. नंतर, १५ दिवसांनी त्याला ग्रीसच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले.भारतीय दूतावासाशी संपर्क करून त्याने आपली कैफियत मांडली. महिन्यातून दोन ते तीन वेळा हा अधिकारी त्याला भेटायला येत होता. त्यांच्या मदतीमुळे तो ठाण्यातील कुटुंबीयांशी संपर्क साधू शकला.सुरुवातीला १५ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर १० दिवसांतच या शिक्षेविरुद्ध वरच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी एक वर्षानंतर सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले. मामा राजेश कदम आणि आईवडीलांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यामुळे तब्बल २९ महिन्यांनी आपली निर्दोष सुटका झाल्याचे कल्पेशने सांगितले.
कल्पेश शिंदे ग्रीसमधून निर्दोष मुक्त; भारतीय दूतावासाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 2:32 AM